औरंगाबाद : 'सीसीटीव्हीत' अडकल्या महिलाचोर

ज्वेलर्सवर डल्ला मारणाऱ्या महिलांच्या मुसक्या आवळल्या
Aurangabad jewellery shop women thief captured in cctv
Aurangabad jewellery shop women thief captured in cctv sakal

औरंगाबाद : ज्वेलर्सच्या दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन बुरखाधारी महिलांना गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. या महिला प्रचंड चतुर असल्याचे लक्षात आले. त्या चोरी केल्यानंतर त्या बराच काळ शहरातच फिरायच्या, घरी जाण्यासाठी वेगवेगळ्या पाच ते सहा रिक्षांमधून प्रवास करायच्या. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने सेफसिटीचे तब्बल २२४ आणि खासगी ७५ असे २९९ सीसीटीव्ही तपासून त्यांना अखेर शोधून काढत, गजाआड केले. त्यांच्याकडून पावणेचार तोळे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

बुशरा परवीन अब्दुल गफूर खान ऊर्फ बुशरा परवीन शेख नईम (रा. रोजाबाग) आणि मुन्नी बेगम हुसेन खान (संजयनगर) अशी अटक केलेल्या बुरखाधारी आरोपी महिलांची नावे आहेत. याविषयी माहिती देताना, आघाव म्हणाले, पीएनजी ज्वेलर्स (एन-३, सिडको), वामन हरी पेठे ज्वेलर्स (समर्थनगर), सावंत ज्वेलर्स (त्रिमूर्ती चौक) आणि रिलायन्स ज्वेल्स (रिलायन्स मॉल, गारखेडा) आदी दुकानांत सोने खरेदीच्या बहाण्याने जाऊन आरोपी बुरखाधारी महिलांनी सेल्समनची नजर चुकवून एक ते दोन तोळे दागिन्यांवर डल्ला मारला होता, विविध चार दुकानांमध्ये या घटना घडल्या.

मात्र, आरोपींचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे गुन्हे शाखेने सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अजित दगडखैर यांच्या पथकाला समांतर तपासाचे काम दिले. त्यांनी सेफसिटीचे २२४ आणि खासगी ७५ असे तब्बल २९९ सीसीटीव्ही तपासले. यातून चोरी केल्यावर महिला काय करतात?, कुठे जातात? यासारख्या अनेक बाबींची माहिती गोळा केली.

रिलायन्स ज्वेलर्समध्ये १९ मे रोजी बुशरा आणि मुन्नी यांनी डल्ला मारला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीचा बारकाईने अभ्यास केला. त्यात सहा रिक्षा बदलून त्या एका ठिकाणी उतरल्या. तेथून रोजाबागकडे जाण्यासाठी बुशराने दुचाकी घेऊन तिच्या मुलाला बोलावले. बुशराने बुरखा घातलेलाच होता, मात्र तिच्या मुलाचा चेहरा उघडा होता.

नेमका तोच फायदा गुन्हे शाखेला मिळाला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे थेट बुशराचे घर गाठले. पोलिसांनी खाक्या दाखविताच बुशरा बोलू लागली. तिनेच मुन्नीचे नाव सांगितल्यावर दोघींनाही अटक केली. ही कारवाई शिंदे, दगडखैर यांच्यासह सहायक फौजदार सतीश जाधव, रमेश गायकवाड, अंमलदार दत्तात्रय गढेकर, भगवान शिलोटे, राजेंद्र साळुंके, विशाल पाटील, विलास मुठे, नितीन धुळे, रवींद्र खरात, काकासाहेब अधाने, नितीन देशमुख, संजिवनी शिंदे, प्राजक्ता वाघमारे, गीता ढाकणे, प्रीती ईलग, मोहिनी चिंचोळकर व हिरा चिंचोळकर यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com