अडीच महिन्यानंतरही ५७८ अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

Sakal
Sakal

पाचोड (औरंगाबाद): दिवाळीपूर्वीच अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याची शासनाची घोषणा तीन महान्यानंतरही फोल ठरली आहे. बँकेकडे अनुदान रक्कम वर्ग करून अडीच महीने उलटले, तरी अद्याप खादगाव (ता.पैठण) येथील ५७८ शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदतीचा एकही रुपया  जमा न झाल्याने शेतकऱ्यांची अनुदानासाठी फरफट सुरू आहे.

लाभार्थ्याच्या अनुदानासाठी बँक, तलाठी व तहसील दरबारी चकरा सुरु असून बॅंकेकडूनच लाभार्थ्यांच्या खात्यावर रकमा वर्ग करण्यास दिरंगाई होत असल्याने स्वतः तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने सर्व खातेदारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

शासनाने सन २०२०च्या खरिप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे बहुवार्षिक व आश्वासित सिंचनाखालील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित पिकांसाठी आर्थिक मदत जाहीर केली होती. जिरायती व आश्वासित सिंचनाखालील पिकांसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांच्यासाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत अनुज्ञेय केली होती.

या निधीच्या वितरणासाठी तातडीने बाधित क्षेत्र आणि शेतकरी संख्या याप्रमाणे यादी तयार करण्याचे काम पैठण तहसील कार्यालयाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाकडे सोपविण्यात आले होते. यासाठी शासनाकडून पैठण तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात ३७ कोटी २५ लक्ष २८ हजार रुपये दिवाळीपूर्वी तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे वर्ग करण्यात आले. शासनाने दिवाळी पूर्वीच सदरील रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून दिवाळीचा गोडवा वाढविण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी सर्व शेतकऱ्यां च्या नुकसान अहवालासह बँकेचे खाते क्रमांक जमा करून तहसिल कार्यालयात दाखल करण्यात येऊन तालुक्यातील जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्याचे अनुदान जमा झाले असले तरी अद्याप खादगाव (ता.पैठण) येथील ५७८ लाभार्थ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही.

शेतकऱ्यांचा शासनाच्या आर्थिक मदतीची अद्याप प्रतिक्षा लागून आहे. २० नोव्हेंबर २० रोजी पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बालानगर (ता.पैठण) येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ५७८ शेतकऱ्यांचे ४१ लाख ८२ हजार ६५० रूपये अनुदानाचे धनादेश (क्रमांक २८७४७६) देऊन पंधरा दिवसांत लाभार्थांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करण्यासंबंधीचे आदेश दिले होते. तालुक्यातील इतर बँकेकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांस मदत वाटपाचे काम पूर्णत्वाकडे आले असून केवळ बालानगर येथील सहकारी बँकेच्या दिरंगाईमुळे खादगाव येथील शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचे काम रखडल्याचे पाहवयास मिळते.

शेतकरी दररोज तलाठी सज्जापासून तहसिल कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र बँकेची उदासिनताच केवळ अनुदान वाटपास जबाबदार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे, शेतकरी गोपिनाथ डाके, भागवत डाके, शिवाजी डाके, साईनाथ डाके, संजय चाबुकस्वार, नाना पठाडे,संतोष जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com