
Aurangabad : आमदार प्रशांत बंब यांच्या व्हिडिओनंतर ‘सोशल वॉर’!
गंगापूर : गंगापूर साखर कारखाना निवडणुकीनंतर तालुक्यातील आमदार प्रशांत बंब यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याने बंद कारखान्याचे चर्चेचे गुऱ्हाळ राज्यात गाजू लागले आहे.
कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आमदार बंब यांना प्रत्युत्तर देत दिवाळीत साखर कारखाना सुरू करून आमदार बंब यांची ‘साखरतुला’ करणार असल्याचे जाहीर केले. तर राष्ट्रवादीचे नेते संतोष माने यांनी आमदार बंब यांची शरद पवार यांचे नाव घेण्याइतकी उंची नसल्याची टीका केली.
गंगापूर कारखान्याची निवडणूक यंदा चांगलीच गाजली. यात आमदार बंब यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला. त्यानंतर आमदार बंब यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओत म्हटले आहे, की सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि त्यामुळे वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या याला ‘बारामतीचे काका’ जबाबदार आहेत. आतादेखील या निवडणुकीत त्यांच्या इथल्या नेत्यांनी आणि अनुयायांनी शेतकरी, सभासद आणि नागरिकांची दिशाभूल केली.
आमिष दाखवले गेले आणि त्याला सभासद शेतकरी बळी पडले. गेली अनेक वर्षे मी आणि माझे सहकारी हा कारखाना सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करीत होतो. पण बारामतीचे काका, त्यांचे अनुयायी आणि आता निवडून आलेल्या पॅनलचे प्रमुख यांनी आमच्या मार्गात अडथळे आणले.
यावर उत्तर देताना संतोष माने म्हणाले, की ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव घेण्याइतकी आमदार बंब यांची उंची नाही. मतदारांनी नाकारूनही बंब ठिकाणावर आलेले नाहीत. ‘बारामतीचे काका’ असा उल्लेख केल्यानेच तुम्ही निवडणूक हरलात. मतदारसंघात तुमचे काम नाही. म्हणूनच तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत पैसा वाटप करावा लागतो, असा आरोपही माने यांनी केला.
कृष्णा पाटील डोणगावकर म्हणाले, की आमदार बंब स्वतःचे अपयश झाकण्यासाठी तथ्यहीन आरोप करीत आहेत. कारखाना सुरू व्हावा असा आमचा प्रामाणिक हेतू आहे. विधानसभेला मदत होईल म्हणून आमदार बंब यांनी कारखान्यात काळा पैसा भरला. संधी देऊनही त्यांना आठ वर्षांत कारखाना सुरू करता आला नाही.
२०२० मध्ये कारखाना सुरू करण्याऐवजी सहा जणांच्या नावे रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. आता यंदाच कारखाना सुरू करून दिवाळीला आमदार बंब यांची साखरतुला करणार असल्याचा टोलाही श्री. डोणगावकर यांनी लगावला आहे.