औरंगाबाद : तुमचा वीजपुरवठा खंडित होणार आहे...

भामट्यांकडून फसवणुकीचा नवा फंडा ः बनावट मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन
Aurangabad MSEB be aware from power supply cut fake sms
Aurangabad MSEB be aware from power supply cut fake smssakal

औरंगाबाद : ‘आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज रात्री ९.३० वाजता आपला वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. फसवणुकीचा हा नवा फंडा उघड झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या ग्राहकांना बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे.

तसेच या अधिकृत मेसेजमधून कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जात नाही. महावितरणकडून केवळ ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहेत व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

यावर साधा संपर्क

वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com