
औरंगाबाद : कंत्राटी संगणकचालकावर गुन्हा दाखल
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला प्रभागरचनेचा व्हायरल प्रारूप आराखडा बोगस असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. पण आता या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांच्या आदेशावरून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी कंत्राटी संगणकचालक काझी हस्तीयाज सोहेल काजी याच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात प्रशासनाने तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने १७ मेपर्यंत प्रभाग रचनेचे प्रारूप पाठविण्याचे आदेश दिले होते. पण नकाशे वेळेत मिळाले नसल्यामुळे हा मुहूर्त हुकला. दरम्यान लोकसंख्येमध्ये तफावत असल्याने निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोगाने महापालिका अधिकाऱ्यांना मुंबईला पाचारण केले. असे असतानाच शुक्रवारी प्रभागरचनेचे प्रारूप व्हायरल झाले. त्यावरून शहरात एकच गोंधळ उडाला.
या प्रकरणी आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेऊन प्रभागरचनेचे प्रारूप फुटल्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याची तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आस्थापना विभागाचे सहायक आयुक्त विक्रम दराडे यांनी सोमवारी रात्री सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
काय म्हटले आहे तक्रारीत...
तक्रारीत म्हटले की, महापालिकेच्या कार्यालयातील कंत्राटी संगणकचालक काझी हस्तियाज सोहेल काझी याने २० ते २८ मे दरम्यान त्याच्या ताब्यात असलेले शासकीय निवडणुकीचे गोपनीय दस्तऐवज हे प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर व्हायरल केले. यावरून काझी हस्तियाज सोहेल काझी याने निवडणुकीबाबत प्रभागरचनेशी संबंधित कच्ची व प्राथमिक माहिती व्हायरल केली असे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे त्याच्यावर कलम ४०९ भा. द. वि. सह शासकीय गुपिते अधिनियम वर्ष १९२३ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा.
अधिकारी सुटले, कर्मचारी अडकले
व्हायरल झालेले प्रभाग रचनेचे प्रारूप बोगस असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. पण राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे महापालिकेतील बोगस कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्त व इतर अधिकाऱ्यांवर प्रशासकांनी सोपविली होती. पण प्रारूप तयार करण्यासाठीची मदार ही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होती. त्यांनीच महापालिकेचा घात केला. याप्रकरणात वरिष्ठ अधिकारी मात्र नामानिराळे राहिले.
Web Title: Aurangabad Municipal Complaint Case Filed Against Computer Operator
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..