
Job News : महापालिकेत फुटणार नोकर भरतीचा नारळ
औरंगाबाद : महापालिकेच्या नोकर भरतीची अनेक वर्षांपासून चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात नोकर भरती महिनाभरात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने १२५ पदांसाठी नोकर भरती करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे पत्र राज्य शासनाला पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त होत आहेत तर दुसरीकडे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कारभार सांभाळताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.
त्यामुळे नोकरभरतीसाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. नोकरभरतीसाठी आकृतिबंध व सेवा भरती नियमांना मंजुरी मिळणे गरजेचे होते. त्यानुसार राज्य शासनाने आकृतिबंध व त्यानंतर सेवा भरती नियमावलीला मंजुरी दिली, पण नोकर भरतीसाठी अडचणी सुरूच होत्या.
नव्या आकृतिबंधानुसार महापालिकेतील मंजूर पदांची संख्या पाच हजार २०२ झाली आहे. त्यापैकी दोन हजार ९६५ कर्मचारी कार्यरत आहेत तर दोन हजार २३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर टप्प्या-टप्प्याने नोकर भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान राज्य सरकारनेच महापालिकेला पत्र पाठवून मे २०२३ पूर्वी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
त्यामुळे प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात वर्ग एक ते तीन मधील निवडक १२५ पदांचा समावेश आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, लिपिक, अग्निशामक कर्मचारी यासह इतर सरळ सेवा भरतीच्या पदांचा समावेश आहे.
शासनाकडून परवानगी मिळाल्यास महिनाभरात प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
आस्थापना खर्चाची पाळावी लागणार मर्यादा
नोकर भरती करताना आस्थापना खर्चाची मर्यादा महापालिकेला पाळावी लागणार आहे. आस्थापना खर्च म्हणजेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते यावरील खर्च एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्के असला पाहिजे. पण औरंगाबाद महापालिकेचा हा खर्च ४० टक्के आहे. त्यामुळे या खर्चाच्या मर्यादेत राहून टप्प्या-टप्याने नोकर भरती केली जाणार आहे.