Aurangabad news
Aurangabad news

आयुक्त, महापौरांचे ‘देर आये दुरुस्त आये’ धोरण सातारा-देवळाईच्या पथ्यावर पडेल का

औरंगाबाद : सातारा देवळाईतील विविध वसाहतींना नुकत्याच भेटी देऊन महापालिका आयुक्तांनी नागरी समस्या जाणून घेतल्या. प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना कामाला लावणारे आणि प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन समस्या सोडविण्यासाठी तत्पर असलेले आस्तिककुमार पांडेय हे एकमेव आयुक्त ठरले आहेत.

सातारा देवळाई गावे महापालिका हद्दीत येऊन 5 वर्षे लोटली आहेत परंतु अद्यापही येथील नागरिकांचा वनवास संपला नाही. अनेकांनी जीवनभराची पै पै जमवून येथे भूखंड खरेदी केले. शहराच्या जवळ असल्याने आपल्यालाही येथे शहरा प्रमाणे नाही, परंतु त्यातुलनेत तरी सोयी सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु भूखंड असूनही महापालिका बांधकाम परवानगी देत नाही, बांधकाम परवानगी नाही म्हणून बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना भूखंड असूनही त्यावर घर बांधतांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते आहे.

जर कुणी इकडून तिकडून, मित्र, नातेवाईकांकडून मदत घेऊन घराचे बांधकाम केले तर त्यावर अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवला जातो. अश्या कात्रीत सापडलेल्या नागरिकांना यामुळे मोठा मनस्ताप होत आहे. परंतु आता यावर उशिरा का होईना, आयुक्त पांडेय यांनी सातारा देवळाई येथील नागरिकांना बांधकाम परवानगी देण्यासाठी कॅम्प लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

आता या कॅम्पच्या माध्यमातून महापालिकेचे संबंधित अधिकारी खरोखरच नागरिकांना एन ए, ले आउट, बेटरमेंट आदी नियमांचा बागुलबुवा न करता परवानगी देणार की पुन्हा नागरिकांकडून जमा करण्यात आलेल्या फाईली लालफितीत बंदिस्त करून ठेवणार असा प्रश्न आहे. आयुक्तांनी केवळ आदेश देऊन हा प्रश्न निकाली निघेल असे नाही, तर त्यासाठी खरोखरच इच्छाशक्ती असेल तर बांधकाम परवानगीसाठी काही नियम शिथिल करून बांधकाम परवानगी दिली जाते की नाही याचा आढावा आयुक्तांकडून वारंवार घेणेही गरजेचे आहे.

ज्या खास पद्धतीने आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीला बळकटी दिली तशीच बांधकाम परवानगी देण्यासाठी देखील लक्ष केंद्रित केल्यास नागरिकांचेही काम सुकर होईल आणि महापालीकेलाही आर्थिक फायदा होईल. शिवाय बांधकाम परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली तर नागरिक देखील अनधिकृत बांधकामे करणार नाहीत. आणि खऱ्या अर्थाने शहराची वाटचाल ‘स्मार्ट सिटी’कडे होतेय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

महापौर नंदकुमार घोडेले यांचाही नहले पे दहला...!

सातारा देवळाईत बांधकाम परवाना देण्याचा कॅम्प नुसताच फार्स ठरू नये, यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनीदेखील प्रशासनाला बांधकाम परवाना देण्याच्या अटी शिथिल करण्याचे आदेश दिले. बांधकाम परवानगी देताना भूमी अभिलेख विभागाकडून भूखंडाचा मोजणी नकाशा आणण्याची अट रद्द करण्याचे आदेश दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु महापालिकेच्या नगररचना विभागाने मात्र महापौरांच्या आदेशाला न जुमानता भूखंडाचा मोजणी नकाशा लागणारच असा फतवा काढल्याने नागरिकांच्या पदरी निराशा पडली.

नागरिकांच्या वैयक्तिक मालकीचा भूखंड मोजायचा असल्यास गटातील सर्व सातबारा धारकांची मोजणी फीस भरावी लागत असल्याचा दावा केला जात आहे. सर्व गटाची मोजणी फीस भरणे नागरिकांना श्यक्य नसल्याने अनेकांचे बांधकाम परवानगी अर्ज थप्पीला लागण्याची श्यक्यता आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ग्रामपंचायतचा ले आउट ग्राह्य धरण्याची दिलेले आदेश फेटाळल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com