esakal | ओव्हरटाइम करूनही अलाऊन्स नाही, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीच व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेच्या तिजोरीत कररूपी महसूल जमा करण्यात मोलाचा वाटाही या कर्मचाऱ्यांचा आहे; परंतु सुटीच्या दिवशी येऊन जादा काम करूनदेखील वॉर्ड कार्यालयातील कर्मचारी जादा कामाच्या आर्थिक मोबदल्यापासून (ओव्हरटाइम) वंचित असल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

ओव्हरटाइम करूनही अलाऊन्स नाही, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीच व्यथा

sakal_logo
By
दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : महापालिकेच्या मालमत्ता कर, पाणीपट्टी, तसेच अकृषक करांसह विविध प्रकारची वसुलीची कामे करणारे वॉर्ड कार्यालयांतील कर्मचारी चार वर्षांपासून दुसरा, चौथा शनिवार, रविवार आणि अन्य सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करवसुलीसाठी कार्यालयात येऊन वसुलीचे काम इमाने-इतबारे करीत आहेत.

आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेच्या तिजोरीत कररूपी महसूल जमा करण्यात मोलाचा वाटाही या कर्मचाऱ्यांचा आहे; परंतु सुटीच्या दिवशी येऊन जादा काम करूनदेखील वॉर्ड कार्यालयातील कर्मचारी जादा कामाच्या आर्थिक मोबदल्यापासून (ओव्हरटाइम) वंचित असल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

चार वर्षांपूर्वी अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही जादा कामाचा मोबदला दिला जात होता; परंतु मागील चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम बंद झाल्याने कर्मचारी सुटीच्या दिवशी करवसुलीच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत असल्याचे सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

या कर्मचाऱ्यांकडून चार वर्षांपासून दर मार्चअखेर रविवारसह सर्व सुटीत वसुलीचे काम करून घेण्यात येते; परंतु त्याचा मोबदला काहीच मिळत नाही. चार वर्षांपूर्वी ओव्हरटाइम मिळत होता; पण आता तोही मिळत नाही. काही विभागांतील कर्मचाऱ्यांना मोबदला मिळतो; मात्र वॉर्ड कर्मचाऱ्यांना मिळत नाही असा दावा सूत्रांनी केला आहे. अग्निशमन विभाग तसेच स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना जादा कामाचा मोबदला दिला जातो; मग वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच असा अन्याय का, असा प्रश्नही वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून आता उपस्थित केला जात आहे.

पाच दिवसांच्या आठवड्यावरही पाणी 

वॉर्ड कार्यालयातील वसुली कर्मचाऱ्यांच्या दुसरा व चौथा शनिवार तसेच सार्वजनिक सुट्या बंद करण्यात आल्या आहेत. ता. २० फेब्रुवारीपासूनपासून रविवारची सुटीही बंद करण्यात आली; मात्र इतर विभागांतील व वसुली कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना ता. २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला. मालमत्ता कर व पाणीपट्टी महानगरपालिकेच्या आर्थिक बाबीशी निगडित असल्याने सुटीत काम करण्यास हरकत नाही; पण त्याचा योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे. जो की २०१५-१६ पासून देण्यात येत नाही.

भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि... 

वॉर्ड कार्यालयातील अन्य कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू झाला आहे; परंतु मार्च एंडिंगच्या वसुलीमुळे करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र पाच दिवसांच्या आठवड्यापासून वंचितच ठेवण्यात आले आहे. जादा कामाचा मोबदला तसेच अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही हक्काच्या सुट्या मिळाव्यात यासाठी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय तसेच महापौर नंदकुमार घोडेले लक्ष घालतील काय, याकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

loading image