औरंगाबादच्या विकास निधीत ठाकरेंना फडणवीस वरचढ

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद- शहराला विकासकामांसाठी निधी देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीच कमतरता केली नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांसाठी ४६२ कोटींचा निधी मंजूर केला असता, तर संपूर्ण शहरातील रस्ते झाले असते, असा चिमटा भाजपने गुरुवारी (ता. २७) सरकारच्या अभिनंदन ठरावावरून शिवसेनेला काढला. फडणवीस सरकारच्या काळात शहराला मिळालेल्या निधीची यादीच भाजप नगरसेवकांनी यावेळी वाचून दाखविली. 

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी नुकताच १५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून २३ रस्ते कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र रस्त्यांची यादी अंतिम कोणी केली? आमच्या भागातील रस्ते का निवडले नाही? असा प्रश्‍न भाजप, एमआयएम नगरसेवकांनी केला. राज वानखेडे यांनी माझ्या वॉर्डातील रस्ता वगळल्यामुळे नागरिकांत नाराजी असल्याचे नमूद केले. अब्दुल नाईकवाडी यांनी सेंट्रलनाका रस्ता डांबरीकरणाचा का घेण्यात आला, याचा खुलासा घेण्याची मागणी केली. त्यावर खुलासा करताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी रस्त्यांची यादी शासनस्तरावर अंतिम झाली आहे. पालकमंत्री, आयुक्तांनी ती अंतिम केली असून, आज आयुक्त हजर नाहीत. मात्र यादी अंतिम करताना गुप्तता पाळण्यात आली, निविदा अंतिम होईपर्यंत मलाही काहीच माहीत नव्हते, असा दावा महापौरांनी केला.

त्यानंतर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी राज्य शासनाने रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी दिल्याबद्दल अभिनंदन ठराव मांडला. रस्त्यांसाठी आतापर्यंतचा सर्वांत जास्त निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. रस्ते निवडताना कुठलाही भेदभाव करण्यात आलेला नाही, असे जंजाळ यांनी नमूद केले. त्यावर भाजपचे राजू शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरासाठी भरभरून निधी दिला. रस्त्यांसाठी २५, १०० कोटी, १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, कचराप्रक्रियेसाठी ९१ कोटी रुपये दिले. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी रस्त्याची संपूर्ण यादी मंजूर करून ४६२ कोटींचा निधी दिला असता तर शहरातील रस्त्यांचा विषय संपला असता, असा चिमटा काढला. त्यावर महापौरांनी ही तर सुरवात आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी आणखी निधी मिळेल असे उत्तर दिले, तर उपमहापौरांनी राजकारण थोडे बाजूला ठेवा, अशी विनंती शिंदे यांना केली. 

तुम्ही पुन्हा येणार... 
सर्वसाधारण सभेला आयुक्त आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह अनेक अधिकारी गैरहजर होते. कोण अधिकारी कोणत्या कामासाठी बाहेर आहे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले. दरम्यान, रस्त्यांच्या यादीसंदर्भात योग्य वेळी खुलासा घेतला जाईल, तुम्ही पुन्हा महापालिकेत येणार आहात... असे उत्तर महापौरांनी राज वानखेडे यांना दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com