कोरोनाची धास्ती... रेल्वेस्थानक, बसस्थानकावरही होणार प्रवाशांची तपासणी

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : शहरात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला असला तरी खबरदारी म्हणून विमानतळापाठोपाठ आता रेल्वेस्थानक, मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ४० थर्मल गन मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या गनव्दारे ताप किती आहे याची तपासणी केली जाते. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच सर्वसाधारण सभा व महापालिकेचे कार्यक्रम देखील स्थगित करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वी शहरात कोरोना व्हायरसचा संशयित रूग्ण आढळून आला होता. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी शहरात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी विमानतळापाठोपाठ बसस्थानक व रेल्वेस्थानकावर तपासणी करण्याचा निर्णय शनिवारी (ता. १४) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या दालनात आढावा बैठक घेतली.

बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, रेल्वेस्टेशनचे स्टेशन मॅनेजर विक्रमकुमार, औरंगाबाद हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष हरप्रितसिंग, शिवाजी पाटील, आयएमएचे डॉ. कुलदीपसिंह राऊळ, डॉ. पी. आर. गाढे, स्वच्छतादुत भगतसिंग दरख, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीनंतर महापौर नंदकुमार घोडेले पत्रकारांना माहिती देताना म्हणाले, की शहरात विमानाने येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनींग होत आहे. मात्र रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकावर अद्याप स्क्रिनींगची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर स्क्रिनींगची व्यवस्था करण्यासाठी धूत हॉस्पिटलने सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्या सहकार्याने महापालिकेच्या माध्यमातून विशेष कक्ष उघडला जाईल. रेल्वेस्टेशनवर ‘सिंगल डोअर एन्ट्री व एक्झीट’ची व्यवस्था करण्याची सूचना स्टेशन मॅनेजरला करण्यात आली आहे. बसस्थानकावरही अशीच पध्दत करण्याचा विचार सुरू आहे. पोलीस विभागाची मदत घेतली जाईल. आयएमएतर्फे सुमारे दोन हजार स्टीकर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महापालिकेच्या क्षेत्रात ९७५ शाळा आहेत, सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्वांसाठी सॅनीटायझरची व्यवस्था देखील आयएमएच्या माध्यमातून करण्याची ग्वाही आयएमएच्या प्रतिनिधींनी दिली आहे. गणच्या माध्यमातून ताप तपासला जातो. अशा चाळीस गण तातडीने खरेदी करण्याचे आदेश बैठकीत महापौरांनी दिले. 

आठवडी बाजारात डॉक्टरांचे पथक 
शहरात तीन ठिकाणी आठवडीबाजार भरतो. या तिन्हीही ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक तैनात केले जाणार आहे. तसेच आठवडी बाजारात आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना कंत्राटदारांना करण्यात आली आहे. नाट्यगृह, पोहण्याचे तलाव बंद करण्याचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महापालिकेच्या मुख्यालयात देखील आता सिंगल डोअर एन्ट्री दिली जाईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 

१५ जणांपैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही 
औरंगाबाद विभागात १५ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे आत्तापर्यंत औरंगाबादेत कोरोना पोचलेला नाही. म्हणून जनतेने घाबरण्याची गरज नाही, फक्त काळजी घ्यावी. गर्दीत जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे. घराच्या खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती ठेवावी, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. लाळे यांनी केले. 
 
परदेशी व्यक्तीने केला तपासणीला विरोध 
शहरात आलेल्या परदेशी व्यक्तीची खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे. मात्र अशा तपासणीला विरोध होत आहे. विदेशातून आलेल्या एखाद्या व्यक्तीच्या तपासणीसाठी आमचे पथक गेले असता, तिथे विरोध झाला, तुमच्यामुळे माझी बदनामी झाली, असे सांगून येथून पथकाला काढून देण्यात आले, असे डॉ. नीता पाडळकर यांनी बैठकीत सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com