
Aurangabad : संकेतची हत्या ‘कर्ज’ चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवेल ; ॲड. उज्ज्वल निकम
औरंगाबाद : संकेत कुलकर्णी याचा मृत्यू हा अपघाताने झालेला नाही. आरोपी संकेत जायभाय याने जाणीवपूर्वक कारखाली चिरडून त्याची हत्या केली आहे. सदरील घटना ही ‘कर्ज’ चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवेल अशी आहे. या चित्रपटातील नायकाचा खलनायक कार अंगावर घालून हत्या करतो, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी (ता. २३) न्यायालयात केला.
जिल्हा व सत्र न्यायालयात संकेत कुलकर्णी खून प्रकरणाची अंतिम सुनावणी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांच्या न्यायालयात सुरू झाली आहे. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ॲड. निकम यांनी युक्तिवाद केला. घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी सत्य आणि प्रामाणिक हेतूने दिलेल्या आहेत, हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.
युक्तिवादादरम्यान ॲड. उज्ज्वल निकम यांनी आरोपी संकेत जायभाय याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी या प्रकरणातील आरोपीची मैत्रिण व साक्षीदार हिच्या साक्षीवर भर दिला. संकेत कुलकर्णीची हत्या केल्यानंतर संकेत जायभायने त्याच्या मैत्रिणीस मोबाईलवर मेसेज करून संकेत कुलकर्णी व माझे भांडण झाले व मी सर्व काही संपवले, असा मेसेज केला.
तसेच घटना घडल्यानंतर तिला तीन वेळेस फोन करून संकेत कुलकर्णी तुला बोलत होता, त्यामुळे मी त्याला अंगावर कार घालून मारले, असे सांगितले. ही बाब एका अर्थाने आरोपीने त्याच्या मैत्रिणीकडे दिलेली कबुली आहे. याबाबत दोघांच्याही मोबाईलचे सीडीआर यावेळी न्यायालयात दाखल करण्यात आले.
संकेत कुलकर्णीच्या मैत्रिणीने या सर्व बाबी तिच्या साक्षीत सांगितल्या, त्यामुळे हा महत्त्वाचा पुरावा आहे. घटनेतील इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी संकेत जायभाय याने मृत संकेत कुलकर्णीच्या अंगावर चार ते पाच वेळा कार घालून क्रूर हत्या केल्याची साक्ष दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीने मृत संकेत कुलकर्णी याला अनेकवेळा फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले.
त्याचे मोबाईल सीडीआर न्यायालयात दाखल केले. दुपारनंतर सुनावणी तहकूब करण्यात आली असून, पुढील सुनावणी उद्या शुक्रवारी (ता. २४) होणार आहे. न्यायालयात सुनावणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम बाजू मांडत आहेत. त्यांना जिल्हा सरकारी वकील ॲड. अविनाश देशपांडे, ॲड. सिद्धार्थ वाघ त्यांना सहकार्य करत आहेत तर आरोपीतर्फे ॲड. राजेश काळे, ॲड. निलेश घाणेकर, ॲड. श्री. भाले हे काम पाहत आहेत.