Aurangabad News : माणुसकीची भिंत; कृतार्थ गरजवंत!

स्पर्धा परीक्षार्थींचा उपक्रम : कपडे देण्याच्या आवाहनातून गरजूंची मदत
Aurangabad News : माणुसकीची भिंत; कृतार्थ गरजवंत!

औरंगाबाद : माणसांच्या समूहातूनच समाजाची निर्मिती होते. मग माणसांच्या गरजाही एका अर्थाने समाजावरच अवलंबून असतात. एकमेकांना सहकार्य केल्यास समाज नैतिकदृष्ट्या उन्नत होतो. म्हणूनच ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे सुभाषित प्रचलित झाले आहे.

यानुसारच स्वराज्य सामाजिक फाउंडेशनने ‘माणुसकीची भिंत’ उभी केलीय. त्यात आपल्याला गरज नसलेले कपडे आणून देण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते आणि जमा झालेले कपडे गरजूंना पुरविले जातात. प्रेरणादायी आणि माणुसकी जपणाऱ्या या उपक्रमाला प्रतिसादही चांगली मिळत आहे.

‘एमपीएससी’ ची तयारी करणाऱ्या मुलांनी एकत्र येत हा उपक्रम सुरु केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचा अनेक गरजूंना फायदा झाला आहे. समाजात कुणाकडे खूप काही आहे, तर कुणाकडे अंग झाकायलासुद्धा पुरेसे कपडे नाहीत.

समाजात ही दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. ती कमी करण्यासाठी मोठा आधार ठरणारी, गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र चर्चेत असलेली ‘माणुसकीची भिंत’ आता औरंगाबादमध्येही उभारली गेल्याने गरजूंना मदत मिळत आहे.

‘माणुसकीची भिंत’ ही संकल्पना आता सर्वत्रच लोकप्रिय झाली आहे. ‘नको असेल ते द्या व हवे असेल ते घेऊन जा’, यावर आधारलेली ही भिंत गरीब, मध्यमवर्गीय अशा सर्वांसाठीच आकर्षक ठरली आहे. स्वराज्य सामाजिक फाउंडेशनतर्फे सिडको चौकात हा उपक्रम सुरू आहे. फाउंडेशनतर्फे ‘एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा’, असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे. उपक्रमास्थळी पुरुष, महिला, मुलांचे कपडे वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, फाउंडेशनतर्फे कोणावरही स्वच्छ कपडे आणून देण्याचे बंधन नाही. शहरात सध्या थंडी वाढत असल्याने ही भिंत अनेक गरजूंसाठी खऱ्या अर्थाने माणुसकीची ऊब देत आहे. यासाठी फाउंडेशनचे सोमू पाटील, राहुल कुऱ्हाडे, मनोज भवर, अनिल गवारे, प्रवीण पवार, दिनेश खरात, अविनाश फुके, राम बाविस्कर, सूरज कदम परीश्रम घेत आहेत. यातील बहुतांश स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे असून काही नोकरीलाही लागले आहेत.

‘एमपीएससी’च्या मुलांची संकल्पना

स्वराज्य सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सोमू पाटील यांनी सांगितले, की २०१४-१५ ला आमचा १५ ते २० जणांचा गट एमपीएससीची तयारी करत होता. एकेदिवशी सायंकाळी आम्ही जालना रस्त्याच्या पुलाखाली थंडीने कुडकुडणारी लहान मुले, महिला पाहिल्या. त्यावेळी त्यांच्यासाठी काहीतरी करावे, हा विचार मनात आला. त्यावेळी काही लोकांना जुने कपडे देण्याचे आवाहन केले. लोकांनीही मदत म्हणून दिलेले कपडे आम्ही गरजूंना दिले. त्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान होते. त्यामुळे हे सामाजिक काम असेच पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com