Aurangabad : एक पाऊल मेट्रोच्या दिशेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Metro

Aurangabad : एक पाऊल मेट्रोच्या दिशेने

औरंगाबाद : वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीला जोडणारा एकच उड्डाणपूल व त्यावर मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी महामेट्रोने तयार केलेल्या ६ हजार ८०० कोटी रुपयांच्या डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. २४ किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलासाठी व मेट्रोसाठी शहरातील सेव्हन हिल व मोंढा नाका उड्डाणपूल पाडावा लागणार असल्याचे डीपाआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंत एकच उड्डाणपूल असावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यासोबतच शहराचा गतिशीलता आराखडा व मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी एकत्रित डीपीआर तयार करण्याचे काम औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने महामेट्रोची नियुक्ती केली होती. महामेट्रोने एकाच उड्डाणपुलासाठी ३ हजार ६०० कोटी तर मेट्रोचा ३ हजार २०० कोटींचा डीपीआर तयार केला. सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात डीपीआरचे सादरीकरण झाले. या डीपीआरमध्ये एकच उड्डाणपूल बांधताना व मेट्रो रेल्वेसाठी सेव्हनहिल व मोंढा नाका येथील उड्डाणपूल पाडावे लागणार असल्याचे नमूद आहे.

बैठकीला खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, सिडकोच्या प्रशासक दीपा मुंडे-मुधोळ जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शहर अभियंता सखाराम पानझडे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, छावणी परिषदचे सीईओ संजय सोनवणे तसेच महापालिका, छावणी, स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते. युएमटीसीचे एस. रामकृष्णन यांनी शहराच्या गतीशिलता आराखड्याचे सादरीकरण केले व मेट्रो सेवेचे महामेट्रोचे विकास नगुलकर व साकेत केलकर यांनी सादरीकरण केले.

महावीर चौक उड्डाणपुलासाठी बैठक

क्रांती चौक, सिडकोच्या उड्डाणपुलाला धक्का लागणार नाही. पण महावीर चौकातील उड्डाणपुलाबाबत रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व इतर विभागांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, अशी सूचना यावेळी डॉ. भागवत कराड यांनी अधिकाऱ्यांना केली.

आठ ठिकाणी रँप

वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या २४ किलोमीटरच्या अखंड उड्डाणपुलासाठी आठ ठिकाणी रँप केले जाणार आहेत. या आठ ठिकाणांहून नागरिकांना उड्डाणपुलावर चढता आणि उतरता येईल. शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या गेट क्रमांक एकपासून उड्डाणपुलाची सुरवात होईल. केंब्रिज शाळा, विमानतळ, एसएफएस शाळा, महावीर चौक, एएस क्लब, कामगार चौक, वाळूज या ठिकाणी रँप असतील. सिडको बसस्टँड चौकात आणखी एक रँप तयार करण्याची सूचना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी अधिकाऱ्यांना केली.

संरक्षण मंत्रालयाची लागणार परवानगी

अखंड उड्डाणपूल छावणीच्या (लष्कराच्या) जागेतून जाणार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने महावीर चौकातील उड्डाणपूल उभारण्यासाठी परवानगी दिली नव्हती, त्यामुळे या उड्डाणपुलाची दिशा बदलण्यात आली. याविषयी बैठकीत चर्चा झाली. यावेळी छावणीचे मेजर मुळे म्हणाले, की लष्कराच्या हद्दीत फार उंच पूल बांधता येणार नाही. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतील चार किलोमीटरच्या रस्त्यावर उड्डाणपूल असणार नाही. उड्डाणपूल आणखीन एक किलोमीटर पुढेपर्यंत न्या, बजाज कंपनीच्या पुढेपर्यंत पुलाचे बांधकाम करा अशी सूचना डॉ. कराड यांनी केली.