औरंगाबाद : काहींची अस्वस्थता अन् काहींची कोंडी

पैठण तालुक्यातील स्थिती : मंत्रिमंडळ विस्तारानंतर घडामोडींना वेग
Sandipan Bhumre
Sandipan Bhumre

पैठण : राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार, आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीचा वाजलेला बिगुल या सगळ्या घडामोडींचा परिणाम पैठण तालुक्यातील राजकीय पटलावर होताना दिसून येत आहे. माजी मंत्री संदीपान भुमरे हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांनाही आता मंत्रिपदाचे वेध लागले असून, आगामी निवडणुकांमध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची , याबाबत भुमरे समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

भाजप गोटात मात्र कमालीची राजकीय शांतता दिसून येत असली तरी शिंदे गटाची शिवसेना व भाजप एकत्र आल्याने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची राजकीय कोंडी झाली आहे. दरम्यान, भुमरे यांचे कट्टर समर्थक राजकीय पटलावर कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे . या सगळ्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मात्र राजकीय गळचेपी होत आहे. कार्यकर्त्यांची मनधरणी, फळी तयार करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. निवडणुका लांबल्याने आर्थिक खर्चही वाढला आहे.

निष्ठावंत शिवसैनिकांची विरोधी भूमिका स्पष्ट

दरम्यान, निष्ठावंत शिवसैनिकांनी भुमरे विरोधी भुमिका घेतली असल्याचे चित्र तालुक्यातील बिडकीन येथे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगणार आहे. हे चित्र पाहण्यासाठी याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

भुमरे यांना कोणते मंत्रीपद?

अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री संदीपान भुमरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. आता सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा असून भुमरे यांना पुन्हा तेच खाते मिळते की दुसरे खाते या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com