Aurangabad : शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा बंदोबस्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police officers News

Aurangabad : शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा बंदोबस्त करा

औरंगाबाद : शहर परिसरातील बहुतांश शाळा, क्लासेस, महाविद्यालयांना वर्ग भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस टवाळखोर रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. दामिनी पथकांसह पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी शहरातील सर्वच शाळांमधील मुख्याध्यापकांनी शुक्रवारी (ता.दोन) ‘विद्यार्थ्यांची सुरक्षा’ या कार्यक्रमप्रसंगी केली.

शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोर, रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. शाळा, महाविद्यालय भरताना व सुटताना त्या परिसरात रोडरोमिओ कर्णकर्कश हॉर्न वाजवत जोरात दुचाकी चालवितात, रस्त्यावर उभे राहून मुलींचे नाव घेत छेडणे, शाळेसमोर उभे विद्यार्थ्यांना धमकावणे, कमेंट करणे, हटकल्यास उलट दमदाटी करणे, असे प्रकार वाढले आहेत. यावर प्रतिबंध कसा घालावा, यासाठी सगळेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण संस्था त्रस्त आहेत.

सुरक्षारक्षकांचा नाही धाक

टवाळखोर मुले क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांना दमदाटी करतात. काही महाविद्यालय, शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. मात्र, या सुरक्षारक्षकांचा या टवाळखोरांना धाक राहिलेला नाही. सुरक्षारक्षकाला न जुमानता हे टवाळखोर बिनधास्त शाळा, महाविद्यालय परिसरात प्रवेश करून टवाळकी, मुलींची छेडछाड करतात. शाळा, महाविद्यालयांना कायद्याची पूर्णपणे माहिती मिळाल्यास या गोष्टींवर आळा बसू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

विद्यार्थी सुरक्षा कार्यशाळा

विद्यार्थी, शिक्षकांना कायद्याविषयक माहिती व्हावी, यासाठी सकाळ माध्यम समूह, महाराष्ट्र पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेबाबत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनदेखील उपक्रमाच्या माध्यमातून मुलामुलींना दामिनी पथकाचे कामकाज, संकटकाळी मदत कशी केली जाते? याविषयी माहिती देणार आहे. संकटकाळी विद्यार्थ्यांनी पोलिस हेल्पलाइन नंबर ११२ व महिला हेल्पलाइन १०९१, विद्यार्थी मदत क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.