esakal | औरंगाबाद: बैलाचा मान न घेणारे जगावेगळे थेरगाव
sakal

बोलून बातमी शोधा

pola

औरंगाबाद: बैलाचा मान न घेणारे जगावेगळे थेरगाव

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड: पोळ्याच्या दिवशी बैलाची मिरवणूक काढून मान घेण्याची रीत जुनी असली तरी ज्यांनी कोणी या सणाला आपला बैल प्रथम वेशीतून नेऊन मान घेतला. त्याच्या दावणीला बैल राहत नसल्याच्या अपशकुनाने वेशीतून प्रथम कुणी जाण्यास धजावत नाही.

हेही वाचा: सौताडा धबधबा ओसंडून कोसळू लागला; पाहा व्हिडिओ

त्यामुळे गेल्या साठ वर्षांपासून पोळ्याचा मान ग्रामदेवतेला नवसापोटी सोडलेल्या 'कठाळ्याला (वळू) दिला जात असल्याने 'कठाळ्या'च सर्वधर्म समभावाचा प्रतीक अन् पोळ्याचा मानकरी बनला असल्याचे चित्र थेरगाव (ता.पैठण) येथे पाहावयास मिळते. जगात मानपानासाठी दंगे धोपे, भांडणे होत असताना 'मान' नाकारण्यासाठी वाद होणारे हे एकमेव गाव आहे.

थेरगावची लोकसंख्या चार हजाराच्या जवळपास असून सर्वसमाजाचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. सर्वांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने सर्वांच्या दावणीला बैल असून वर्षातून एकदा येणाऱ्या वृषभराजाच्या सणाला शेतकरी ऐपतीप्रमाण साजश्रृंगाराचे साहित्य खरेदी करुन त्यांना सजवतात. पोळ्याचा सण सर्वजण मंदिर-मशिदी समोर एकत्रित साजरा करतात.

गावांत श्रीमंत, सर्वसामान्य, माणसं असली तरी पोळ्याला त्याचा स्पर्शही दिसून येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची खांदेमळणी करण्यात येते. फटाक्यांची आतषबाजी करीत परंपरेनुसार सर्वजण एकत्रित बैल आणून पोळा भरवतात. साठ वर्षापूर्वी वेशीतून पहिल्यांदा बैल काढण्याचा मान कधी हिंदू तर कधी मुस्लिम घराणेशाहीकडे होता. परंतु ज्यांनी वेशीतून पहिल्यांदा बैल काढण्याचा मान घेतला. त्याच्या दावणीला बैल राहीले नाही.

हेही वाचा: पैठण तालुक्यात जोरदार पाऊस; पाहा व्हिडिओ

त्याच्या नशिबी दारिद्र्य फळफळल्याचा ग्रामस्थांचा अनुभव आहे. त्यामुळे साठ वर्षापूर्वी गावातील वजनदार म्हणून ओळखले जाणारे भाऊराव निर्मळ, मन्नू पटेल, एकनाथ लबडे, रंगनाथ कोल्हे आदींनी गावात ग्रामदेवतेला नवसापोटी सोडलेल्या 'कठाळ्या'ला वेशीतून सर्वप्रथम नेऊन पोळ्याचा मान देण्याची प्रथा सुरु केली. ती परंपरा आजही अखंडितपणे कायम आहे.

यानिमित्त पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजा आटोपल्यानंतर वेशीत दुतर्फा बांधलेले तोरण कठाळ्याला पुढे करुन ते तोडल्यानंतर पोळा फुटल्याचे जाहीर केले जाते. गावांत कठाळ्या नसेल तर कुंभाराने बनविलेल्या मातीच्या बैलांना तोरणा पलीकडे फेकून मान दिला जातो. यावेळी शेतगड्यावर बैलाची जबाबदारी सोपविणारा मालक आपले बैल वेशीतून अगोदर जाऊ नयेत म्हणून वेशीजवळच तटस्थ उभे असतात व प्रत्येक जण 'कठाळ्या' कसा पुढे जाईल याचीच काळजी घेतात.

आजपर्यंत गावात मानपानावरून शांतता व एकात्मतेला कधी गालबोट लागले नसल्याचे ज्येष्ठ नागरिक शिवाजीराव निर्मळ यांनी सांगितले. येथे 'कठाळ्या'च सर्वधर्मीयांचे प्रतीक बनले असून पोळ्याचा मान न घेणारे हे जगावेगळेच गाव ओळखले जात आहे. कठाल्याची काळजी घेण्याचे काम गावातील अप्पा महाराज गोलांडे हे करतात.

गावांतील वेशीचे महत्त्व व एकात्मता लक्षात घेऊन जीर्ण झालेली पुरातन वेशीचे नवनिर्माण करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सतरा लाख रुपये दिले असून पुरातन जीर्ण झालेली वेस जमीनदोस्त करून आता नूतन सिमेंट काँक्रीटची दुमजली वेस उभारण्यात येत आहे. वरच्या मजल्यावर सार्वजनिक वाचनालयाची सुविधा असणार असल्याचे मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.

loading image
go to top