औरंगाबाद : बोगस कंपनीच्या नावाने काढली ६७ कोटींची बिले!

दोन व्यापाऱ्यांना अटक : मराठवाड्यातील पहिली सर्वांत मोठी कारवाई
Fraud case
Fraud caseesakal

औरंगाबाद : शहरातील दोन व्यापाऱ्यांनी बोगस कंपनी काढून त्या माध्यमातून २०पेक्षा जास्त कंपन्यांच्या नावे ६७ कोटींची बनावट बिले वापरत शासनाची फसवणूक केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी राज्यकर जीएसटीच्या अन्वेषण शाखेतर्फे दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यकर सहआयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

जी. श्रीकांत म्हणाले की, जीएसटीच्या अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ६७ कोटींची खरेदीची बोगस बिले वापरून त्याद्वारे १२ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करून शासनाची फसवणूक झाल्याचे उघड झाले. ॲल्युमिनियम स्क्रॅपच्या दोन व्यावसायिकांकडे छापे टाकण्यात आले. यात मे. एस. आर. मेटलचे समीर चौधरी आणि मे. डोअर्स वर्ल्ड या फर्मचे मालक मनोज व्यास यांना बुधवारी अटक करण्यात आली. या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असताना त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

नाशिक क्षेत्रातील जीएसटी कायद्यांतर्गत अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. सदर प्रकरणात मालाची कोणतीही वाहतूक न करता बनावट ई-वे बिल तयार केल्याची बाबदेखील वस्तू व सेवाकर विभागाच्या लक्षात आली आहे. या इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याचे अन्वेषण वस्तू व सेवाकर विभागाद्वारे सुरू असून सदर व्यावसायिकांच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहारांची सखोल तपासणी अन्वेषण विभाग करत आहे.

वस्तू व सेवाकर विभागाचे अपर राज्यकर आयुक्त सुभाष एंगडे, राज्यकर सहआयुक्त जी.श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली राज्यकर उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त नितेश भंडारे, सहायक राज्यकर आयुक्त प्रकाश गोपनर तसेच अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी ही कारवाई केली. चोरीचा हा प्रकार ऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये दिसून आल्याची माहिती जी.श्रीकांत यांनी दिली. हिरापूर येथे असलेल्या एस.आर.मेटलचे समीर चौधरी यांनी २०२१ पासून आतापर्यंत दोन वर्षे ६ कोटींची, तर मनोज व्यास यांनी ५.९० कोटींची फसवणूक केली. दोघांनी अनुक्रमे ३३ व ३४ कोटी रुपयांची बनवाट बिले लावली. यात काही व्यवहार एकमेकांत करण्यात आला आहे. यांनी १८ टक्के जीएसटी भरणे गरजेचे होते. यात अजून तपास सुरू आहे, असेही श्रीकांत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com