Aurangabad: वीस दिवसांत तब्बल सव्वा लाख लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

औरंगाबाद : वीस दिवसांत तब्बल सव्वा लाख लसीकरण

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश शासन वारंवार देत आहे. औरंगाबाद जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार १० टक्क्यांनी लसीकरण वाढले असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

‘लस नाही तर प्रवास नाही, कार्यालयात प्रवेश नाही, असा निर्णय महापालिकेचे प्रशासक आस्तिकुकमार पांडेय यांनी घेतला आहे. त्यासोबतच ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवून घरोघरी जाऊन लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. पेट्रोल पंपावर लस घेतली नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, लस घेतली नसेल तर वेतन दिले जाणार नाही, दारूच्या दुकानांवर देखील लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासले जाईल, असे निर्णय प्रशासनाने घेतले आहेत. त्यामुळे शहरातील लसीकरण केंद्रावर पुन्हा एकदा गर्दी दिसून येत आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

बुधवारी (ता. २४) तब्बल २० हजार १३७ एवढे लसीकरण झाले. गुरुवारी (ता. २५) देखील अनेक केंद्रावर लसीसाठी तोबा गर्दी झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. काही ठिकाणी अतिरिक्त पथके पाठवावी लागली. यासंदर्भात डॉ. मंडलेचा यांनी सांगितले की, शहरात १० टक्क्यांनी लसीकरण वाढले आहे. बुधवारची आकडेवारी ६८.३८ टक्के एवढी होती. त्यात दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण नऊ टक्क्यांनी वाढले आहे. या मोहिमेत सुमारे सव्वालाख नागरिकांनी लस घेतल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

तीन पेट्रोल पंपांवर आजपासून लस

शहरात तीन पेट्रोलपंपावर शुक्रवारपासून (ता. २६) तीन पेट्रोल पंपावर लस मिळणार आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनतर्फे क्रांती चौकातील हिंद सुपर, उल्कानगरीतील साई शरण व दिल्लीगेट येथील एन. ए. प्रिंटर या पंपावर कोरोना लसीकरण केले जाणार आहे.

loading image
go to top