esakal | बाबासाहेबांची जयंती उत्साहात; मात्र घराघरांतच 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

महामानवाला कौटुंबिक पद्धतीने घरातच अभिवादन करण्याचे आवाहन 

बाबासाहेबांची जयंती उत्साहात; मात्र घराघरांतच 

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला साजरी होत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती साजरी होणार की नाही, असा संभ्रम आहे. असे असले तरीही बाबासाहेबांची जयंती घराघरांत प्रचंड उत्साहात आनंदाने साजरी करावी, असे आवाहन विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी तसेच साहित्यिकांनी केले आहे. नागरिकांनीही बाबासाहेबांची जयंती घरातच साजरी करण्याची खूणगाठ बांधली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे सावट निर्माण झालेले आहे. जगभरात कोरोनाने हाहाकार उडालेला आहे. भारतातही कोरोनाला हरविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर येता येणार नाही, अशा परिस्थितीत १४ एप्रिलला होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येकाने आपल्या घरातच कौटुंबिक पद्धतीने प्रचंड उत्साहात साजरी करावी, असे आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. 

मान्यवर म्हणतात 

अशी करा जयंती 
प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे (अध्यक्ष बौद्ध साहित्य परिषद) : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजता आपण आपल्या कुटुंबासह घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना वंदन करावे. एकाच वेळी केलेल्या बुद्धवंदनेने संपूर्ण भारतात बुद्धवंदनेचा आवाज घुमेल. त्यामुळे देशात एक शांतमय वातावरण निर्माण होईल. सायंकाळी सात वाजता सर्वांनी आपल्या घरासमोर किंवा कंपाऊडवर व गॅलरीत १४ पणत्या लावाव्यात. वंदना घेताना सोशल डिस्टन्स पाळून त्याचे फोटो काढून फक्त पाच सोशल मीडियावर टाकावेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

घरातूनच स्वाभिमानी भावना प्रकट करा 

प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे श्वास असले तरीही कोरोना या भयंकर विषाणूचे संकट लक्षात घेता प्रत्येक अनुयायाने घरातच बाबासाहेबांना अभिवादन करून आपल्या स्वाभिमानी भावना प्रकट कराव्यात. गर्दी न करता अत्यंत आनंदाने घरातच जयंती साजरी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हा देश चालतो याची जाणीव सर्वांना आहे. भारतीय समूह टिकला तरच आपण टिकणार आहे, याचे भान ठेवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे समाजातील निष्कलंकित अशा व्यक्तीने पुढाकार घेऊन औरंगाबादेत सगळ्या जयंती समितीशी समन्वय साधून, जयंती उत्सव समितीच्या पैशातून किंवा अधिक निधी गोळा करून एखादे मोठे हॉस्पिटल उभे राहू शकेल. असे झाले तर ही मोठी आदरांजली ठरेल. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 उपाशी लोकांची भूक भागवूया 

कृष्णा बनकर (शहर उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) : मी वीस वर्षांपासून स्वखर्चाने मोठ्या जल्लोषात जयंती करतो. संपूर्ण परिसरातील नागरिकांना एकत्र करून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; मात्र यंदा कोरोनाचे मोठे संकट देशासमोर आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने अशा कठीण परिस्थितीत अनेक लोक उपाशी असल्याने त्यांच्या पोटाची भूक भागविण्याचे काम सुरू केलेले आहे. समाजातील गोरगरिबांना अन्नधान्य, किराणा साहित्याचे मी वाटप सुरू केले आहे. 

सर्वप्रथम आपला देश महत्त्वाचा 

(जालिंदर शेंडगे, शहर उपाध्यक्ष, भाजप) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत असताना आंबेडकरी जनतेने आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करावा. कुठल्याही परिस्थितीत बाहेर रोडवर येऊन जयंती साजरी करू नये. काही उत्साही कार्यकर्ते जयंती साजरी करण्यासाठी नागरिकांना भावनिक आवाहन करून रोडवर येण्यासाठी मजबूर करतील; परंतु नागरिकांनीदेखील भावनेच्या आहारी न जाता आंबेडकर जयंती आपल्या घरामध्ये साजरी करावी. बाबासाहेबांनी सर्वप्रथम आपला देश व आपल्या देशातील नागरिक महत्त्वाचे मानले आहेत. त्यामुळे आपणही त्यांची जयंती साजरी करीत असताना याची काळजी घ्यावी. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

बाहेर येण्याचा आग्रह करू नका 

अरुण बोर्डे (एमआयएम) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येकाच्या हृदयात आहेत; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासमोर मोठे संकट आहे. अशा संकटसमयी आंबेडकरी अनुयांयांनी गल्लीत अथवा घराच्या बाहेर येऊन उत्सव साजरा करण्याचा आग्रह धरू नये. घराघरांत बाबासाहेबांची जयंती आनंदात साजरी करावी. याबाबत दलित कृती समिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. 

सामाजिक बांधिलकी जपा 

बाबूराव कदम (रिपाइं प्रदेश कार्याध्यक्ष) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा कोरोनामुळे घरातच साजरी केली पाहिजे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासमोर मोठे संकट आहे. अशा संकटसमयी आपण सामाजिक भान ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकाने स्वत:सोबतच कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी एकत्र गल्लीत अथवा घराच्या बाहेर येऊ नये. प्रत्येकाने बाबासाहेबांची जयंती आनंदात; पण घरातच साजरी करावी. 
 
 

loading image