बदनापूरला नगराध्यक्षपदासाठी दोघींमध्ये सरळ लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगल बारगाजे , नसिमबी शेख
बदनापूरला नगराध्यक्षपदासाठी दोघींमध्ये सरळ लढत

बदनापूरला नगराध्यक्षपदासाठी दोघींमध्ये सरळ लढत

बदनापूर : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. १४) भाजपच्या चित्रा संतोष पवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता या पदासाठी भाजपच्या मंगल जगन्नाथ बारगाजे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नसिमबी मतीन शेख यांच्यात बुधवारी (ता. १६) लढत होणार आहे. अर्थात भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने मंगल बारगाजे यांच्या विजयाचा मार्ग सोपा आहे. तथापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चमत्काराची अपेक्षा आहे.

बदनापूर नगरपंचायत निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी भाजपने ९, भाजप पुरस्कृत दोन अपक्ष अशा ११ जागांवर विजय प्राप्त करून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच व काँग्रेस पक्षाने एक अशा सहा जागा जिंकल्या आहेत. सभागृहात बहुमताची मॅजिक फिगर किमान नऊ असल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदावर भाजपचेच नगरसेवक विराजमान होतील, असे चित्र आहे. तथापि भाजपच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी मंगल बारगाजे यांचे नाव जाहीर करून त्यांची उमेदवारी गटनेते बाबासाहेब कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत दाखलही केली. मात्र त्यांच्या नावाला विरोध दर्शवत भाजपच्या चित्रा संतोष पवार यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली. त्यामुळे भाजपच्या श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला होता. अर्थात या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जो काही निर्णय देतील तो मान्य राहील असे दोन्ही उमेदवारांनी कबूल केले. त्यामुळे नगराध्यक्षाच्या वादावर दानवे पडदा पाडतील, असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना होता.

दरम्यान, या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आमदार नारायण कुचे यांच्यासोबत मागील दोन दिवस झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटी दानवे यांनी नगराध्यक्षपदासाठी मंगल बारगाजे यांच्या नावाला पसंती दिली. शिवाय चित्रा पवार यांना पुढे नगराध्यक्ष होण्याची संधी दिल्या जाईल, असे आश्वासन दिले, त्यामुळे शेवटी चित्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बदनापूर नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपच्या मंगल बारगाजे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नसिमबी शेख यांच्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूणच पक्षीय बलाबल पाहता भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने भाजपच्या हातात बदनापूर नगरपंचायतीची सत्तासूत्रे जातील, असे चित्र आहे. तथापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत अजूनही काहीतरी चमत्कार घडेल, अशी अपेक्षा आहे.

उपनगराध्यक्षपदासाठी शेख समीर चर्चेत

बदनापूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने उपनगराध्यक्षपदही भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे. या पदासाठी प्रभाग क्रमांक चार मधून विजयी झालेले भाजपचे शेख समीर शेख चांद यांना संधी देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

आमच्या पक्षाचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार नारायण कुचे व भाजपच्या नगरसेवकांनी माझ्यावर नगराध्यक्षपदासाठी टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. या निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिल्याने भाजप नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदावर निश्चित विजयी होणार आहे, यात कुठलीच शंका नाही.

-मंगल जगन्नाथ बारगाजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, बदनापूर

बदनापूर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या वतीने अनुक्रमे मंगल बारगाजे व शेख समीर यांचे नाव केंद्रित रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आले आहे. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे.

- नारायण कुचे आमदार, बदनापूर

Web Title: Badnapur Mayoral Post Fight Bjp Mangal Bargaje Ncp Nasimbi Sheikh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad NewsBjpNCP
go to top