Chhtrapati Sambhaji Nagar : ३७९ कोटींच्या रस्त्याला पोलचा टेकू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Bypass big pit on 379 Crores road chhtrapati sambhaji nagar

Chhtrapati Sambhaji Nagar : ३७९ कोटींच्या रस्त्याला पोलचा टेकू

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासचे काँक्रिटीकरण आणि उड्डाणपूल उभारण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. यात हिवाळे पाटील लॉन्स समोरील सिमेंटच्या रस्त्याखाली सात फुटाचे भले मोठे भगदाड पडले असून, ३७९ कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता खचू नये, म्हणून ठेकेदाराने अनोखी शक्कल लढवत तीन लोखंडी पोलचा टेकू दिला आहे.

दरम्यान, देवळाई चौक ते संग्रामनगर पुलापर्यंत ठिकठिकाणी सिमेंटच्या रस्त्याला भगदाडे पडली असून, वाहतुकीमुळे सिमेंट रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून बीड बायपासचे काँक्रिटीकरण आणि उड्डाणपूल उभारणीचे काम संथ गतीने सुरू असल्याने सातारा- देवळाईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

यात देवळाई चौक ते महानुभाव आश्रम चौक रस्त्याची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. यात काही टप्प्यांत सिमेंट रस्ता झाला आहे. मात्र, दोन्ही बाजूंचे काम केले नसल्याने वाहने घसरत आहेत. तसेच रस्त्यांवर मातीचा खच पडल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढून किरकोळ अपघात झाले आहेत.

तर, ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याचे पाइप टाकण्यासाठी जागोजागी रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे देवळाई चौक ते रेणुका माता कमानीपर्यंतच्या काही ठिकाणी सिमेंट रस्त्याखालची माती सरकली आहे. यात हिवाळे पाटील लॉन्स समोरील सिमेंटच्या रस्त्याखाली भगदाड पडले आहे.

दरम्यान, या रस्त्यावरून वाहतूक होऊ नये म्हणून ठेकेदाराने दोनशे मीटरपर्यंत रोडवर माती टाकून रस्ता बंद केला आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

धूळ, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

संग्रामनगर चौक, देवळाई चौक आणि एमआयटी चौकात उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. यात संग्रामनगर चौक उड्डाणपूल तयार झाला आहे. तर, देवळाई चौक येथील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. यामुळे जागोजागी खड्डे व धुळ पसरल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे वाहने संथ गतीने जात आहेत. परिणामी, चौकात वाहतूक कोंडी वाढली आहे. तर, संग्रामनगर चौकातून वाहनांना वळसा घालून साताऱ्याकडे जावे लागत आहे.

दुभाजकाला तडे, पथदिव्यांचे पोलही उखडले

काही महिन्यांपूर्वीच देवळाई चौक ते संग्रामनगर उड्डाणपुलापर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, या रस्त्यावर उभारण्यात आलेले काही दुभाजक तुटले आहेत. तसेच या रस्त्यावर लावण्यात आलेले बहुतांश पथदिवे हे बंद असून, यातील काही पथदिवे उखडून पडण्याच्या स्थितीत आहेत.

संबंधित विभागाला नोटीस

महानुभाव आश्रम चौक ते झाल्टा फाटापर्यंत सीएनजीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन काही ठिकाणी रोडच्या खाली आली आहे. ही लाईन चुकीची गेल्याचे कळतात संबंधित विभागाच्या वतीने सिमेंटचा रस्ता खोदून काढण्यात आला. त्यामुळे सिमेंटचा रस्ता उघडा पडला असून, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्या विभागाला नोटीस पाठवण्यात आली आहे. संबंधित विभागाकडून रस्‍त्याचे काम पूर्ण करून घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.