तेली समाजाचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबद्ध ; चंद्रशेखर बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule

तेली समाजाचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबद्ध ; चंद्रशेखर बावनकुळे

औरंगाबाद : ओबीसी आणि तेली समाजाचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करीत ते सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेलीसमाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

बावनकुळे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांना विविध समाजातील नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत संवाद साधला. यात निराला बाजार येथील तेली समाजाचे नेते अनिल मकरिये यांच्या निवासस्थानी ही चर्चा केली. यावेळी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी निवेदन दिले. समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बावनकुळे पुढे म्हणाले की, समाजाची आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी जनगणना ही काळाची गरज आहे. या जनगणनेमुळे समाजही संघटित होतो. आणि आपल्याला समाजाच्या समस्याही लक्षात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, जो समाज संघटित असतो तो प्रगती करू शकतो. कन्नडकरांनी तेली

समाजाची जनगणना करून उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजाला मकरिये यांच्या रूपाने समाजाला एक सक्षम नेतृत्व लाभलेले आहे. ते समाजाच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात असेही बावनकुळे म्हणाले.

कार्यक्रमात तेली समाज कुटुंब परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, अशोक पांगारकर, डॉ.मच्छिंद्र पाखरे, विश्वनाथ गवळी, गणेश पवार, भारत चौधरी, दत्तू हिरे, सुरेश सोनवणे, ॲड.सदानंद देवे, काशिनाथ मिसाळ, गणेश शिंदे उपस्थित होते.

मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी नेत्यांबरोबर मराठा समाजातील विविध पदाधिकाऱ्यांची विनोद पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात मराठा समाजातर्फे मांडण्यात आलेल्या विविध सूचनाही सरकारपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड, सहकारमंत्री अतुल सावे उपस्थित होते.