Chhatrapati Sambhaji Nagar : कालिचरण महाराजांसह चौघांवर गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य भोवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : कालिचरण महाराजांसह चौघांवर गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य भोवले

सिल्लोड - दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह भाषण करणे, गायन करून चिथावणी देणे व घालून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन केले म्हणून कालिचरण महाराज ऊर्फ अभिजित धनंजय सराग यांच्यासह चौघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी (ता.१४) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मोढा बुद्रुक (ता.सिल्लोड) येथे शनिवारी (ता.१३) कालिचरण महाराज यांच्या हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये कालिचरण महाराज यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत कालिचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग, (रा.अकोला), भाजपचे शहराध्यक्ष तथा संकल्प हिंदूराष्ट्रचे कार्यवाहक कमलेश कटारिया, मोढ्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, केतन कल्याणकर यांच्याविरुध्द रविवारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक विकास आडे करीत आहे.

दरम्यान, याप्रकारानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरिक्षक शेषराव उदार यांची सोमवारी (ता.१५) भेट घेऊन, चुकीचे गुन्हे दाखल केल्याने तातडीने जमिन देण्याची मागणी केली. यावेळी सिद्धेश्वर अर्बन बँकेचे चेअरमन प्रभाकरराव पालोदकर, भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे,

हिंदू जनजागरण मंचचे मनोज मोरेल्लू, सुनील मिरकर, विष्णू काटकर, मधुकर राउत, विनोद मंडलेचा, प्रशांत चिनके, सुनील प्रशाद, विलास पाटील, शामराव आळणे, संतोष ठाकूर, प्रकाश भोजवाणी, नंदू श्रीवास्तव, अतुल प्रशाद, मयूर कुलकर्णी, दादाराव आळणे, अनमोल ढाकरे, नंदू वाघ, राजू गायकवाड यांची उपस्थिती होती.

एखाद्या सभेत सभोवताली घडणाऱ्या किंवा घडलेल्या बाबींची किंवा परिस्थितीची जाणीव करून देणे हा गुन्हा ठरु शकत नाही. परंतु पोलिस प्रशासनाने राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल केल्याचे मोढा प्रकरणात दिसते.

- मकरंद कोर्डे, प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा महाराष्ट्र.

टॅग्स :crimepolice investigation