Chhatrapati sambhajinagar : शहराची वीज पुन्हा खासगीकडे? Chhatrapati sambhajinagar City electricity back private | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Power cut

Chhatrapati sambhajinagar : शहराची वीज पुन्हा खासगीकडे?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात महावितरणच्या समांतर वीजपुरवठ्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी अदानी समूहाने कंबर कसली आहे. त्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड या नावाच्या कंपनीची घोषणा बुधवारी (ता. १५) करण्यात आली.

यामुळे भविष्यात पुन्हा शहरात खासगी वीज वितरणाचा प्रयोग सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी महावितरणमध्ये खळबळ उडाली असून, लवकरच याचा भडका उडण्याची शक्यता आहे.

यापूर्वी शहरात जीटीएलच्या माध्यमातून खासगीकरणाचा प्रयोग झाला होता. त्याला प्रचंड विरोध झाल्यानंतर पुन्हा महावितरणकडे वीजवितरणाची यंत्रणा आली. असे असतानात आता अदानी ट्रान्स्मिशन या वीज वितरण कंपनीतर्फे अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लि. या नावाने उपकंपनीची घोषणा करण्यात आली आहे.

या नव्याने स्थापना होणाऱ्या कंपनीची माहिती मुंबई स्टॉक एस्क्चेंजला देण्यात आली आहे. शहरात महावितरणच्या समांतर वीज वितरण करण्यासाठी अदानी ट्रान्स्मिशनने हे पाऊल उचलले आहे. पुढच्या काळात अदानी समूहातर्फे वीज नियामक आयोगाकडे परवान्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. असे असले तरीही या कंपनीचे एकूण कार्य आणि तिचा उद्देश स्पष्ट करण्यात आलेला नाही. तसेच या कंपनीचे नेमके काम कसे राहील हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

‘ऑरिक’चीही ‘टेंडरिंग प्रोसेस’

शहरालगत शेंद्रा येथे ऑरिक सिटीतर्फे इंडस्ट्रिअल वसाहत अर्थात देशातील पहिले स्मार्ट औद्योगिक शहर साकरल्या जात आहे. शेद्रा-बिडकिन येथील साडेदहा हजार एकरांत होत असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचा हा एक भाग आहे.

ऑरिकमध्ये १८५ प्लॉटचे वितरण झालेले आहे. अजून ५० प्लॉट विक्रीची कार्यवाही सुरू आहे. या औद्योगिक शहराला लागणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी ऑरिकने स्वतःच कंबर कसली आहे. त्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. २५ तारखेपर्यंत निविदेची मुदत आहे. कदाचित या ऑरिकला वीजपुरवठा करण्यासाठीही अदानी समूहाची तयारी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऑरिकनेही मागवल्या निविदा

सुरेश काकाणी (व्यवस्थापकीय संचालक ऑरिक सिटी) ः ऑरिक सिटीसाठी लागणारी वीज ऑरिक स्वतःच पुरवणार आहे. त्यामुळे वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून ऑरिकने निविदा मागवल्या आहेत. ऑरिकला एकूण १०० मेगावॉट विजेची गरज भासणार आहे.

पहिल्या टप्प्यात आम्हाला २५ मेगावॉट वीज लागणार आहे. जी वीज निर्मिती कंपनी माफक दरात कमी वीजपुरवठा करेल त्यांच्याकडून विजेची खरेदी केली जाणार आहे. अदानी समूहाच्या नवीन कंपनीबद्दल मात्र आम्हाला काहीही माहिती नाही.