Chhatrapati sambhajinagar : घरकुल घोटाळा प्रकरण ; घरे, कार्यालयांवर ‘ईडी’चे छापे Chhatrapati Sambhajinagar ED raids houses, offices Gharkul scam case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED raids

Chhatrapati sambhajinagar : घरकुल घोटाळा प्रकरण ; घरे, कार्यालयांवर ‘ईडी’चे छापे

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल निविदा घोटाळा प्रकरणात छत्रपती संभाजीनगर महापालिकेने स्वतःहून फिर्याद दिल्यानंतर कंत्राटदार, कंपनी भागीदारांसह संबंधित १९ जणांविरोधात शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यात कंत्राटदार कंपनीविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी (ता.१७) रितेश कांकरिया, डॉ. सतीश रुणवाल आणि अमर बाफना यांच्यासह संबंधित कंपनी भागीदारांची घरे आणि कार्यालयांवर छापासत्र सुरू केले. नवाबपुरा, गारखेडा (आदित्यनगर), अहिंसानगर, उल्कानगरी, समर्थनगर, पानदरिबा आदी वेगवेगळ्या पथकाने छापे मारून मनी लाँड्रिंगसंदर्भात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केली आहेत.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांत छापेमारी करण्यासाठी शहरातीलच वाहनांचा वापर केला होता. कोणत्याही शासकीय वाहनांचा वापर न करता, तसेच प्रवासी वाहतूक करणारे परमिट वाहने तसेच वैयक्तिक स्वरूपाची खासगी वाहनेही भाड्याने घेत ईडीचे अधिकारी कारवाईसाठी रवाना झाले होते.

इतकेच नव्हे तर या अधिकाऱ्यांनी सिग्नलमध्येही सायरन वाजवत व्हीआयपी वाहतूक व्यवस्था लावू दिली नसल्याचे समोर आले, अगदी शांतपणे, कोणताही गाजावाजा, धावपळ न करता या खासगी वाहनांतून ईडीचे अधिकारी कारवाईसाठी जात एकाच वेळी अहिंसानगर, उल्कानगरी, समर्थनगर, पानदरिबा येथे छापे टाकल्याने एकच खळबळ उडाली होती.

सकाळी सकाळी गाठले बाफनांचे घर

ईडीने सकाळीच पानदरिबा येथील समरथ कन्स्ट्रक्शनचा संचालक अमर अशोक बाफना याचे घर गाठत झाडाझडती सुरू करत त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मनी लॉन्ड्रिंग आणि निविदा घोटाळ्यासंदर्भात कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर त्यांच्या गारखेडा भागात असणाऱ्या कार्यालयावरही ईडीचे पथक पोचले, तिथूनही काही कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

आलिशान कार अन् सोबतीला स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त

एकीकडे बाफनांच्या घर, कार्यालयावर पोचत ईडीची कारवाई सुरू होती, तर दुसरीकडे ईडीच्या पथकाने सकाळी साडेदहा वाजेदरम्यान अहिंसानगरातील सुंदर कन्स्ट्रक्शनचा मालक सतीश भागचंद रुणवाल (रा. प्लॉट क्र. ४९, अहिंसानगर) यांचे घर गाठत छापा मारला. विशेष म्हणजे यावेळी ईडीसोबत जिन्सी पोलिस ठाण्याच्या सात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

महागड्या आलिशान कारमधून येत ईडीच्या पथकाने तिथे कारवाई सुरू केली तर दुसरे एक पथक रुणवालच्या समर्थनगरातील सुंदर कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयावर पोहोचले. तिथून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त केली, तर एक पथक त्यांच्या रुग्णालयातही गेल्याचे समजते.

आमच्या शेजारी काय झालंय?

गुन्ह्यातील भागीदारांपैकी एक असलेले इंडोग्लोबल इन्फ्रा. सर्विसेसचे भागीदार रितेश राजेंद्र कांकरिया (रा. फ्लॅट क्र. ३०१, मिता अपार्टमेंट, नवाबपुरा) हे उल्कानगरातील एका फ्लॅटमध्ये किरायाने राहत असल्याचे पथकाला समजले, दरम्यान हा परिसर जवाहरनर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत

असल्याने आणि थेट फ्लॅटमध्ये छापा टाकायचा असल्याने ईडीच्या पथकाने जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांना मदतीला घेतले. आणखी पोलिस बंदोबस्त घेऊन कांकरिया यांचे फ्लॅट क्र. १, पसायदान अपार्टमेंट, आदित्यनगर, उल्कानगरी येथील घर गाठले. घरात पंचनामा करून मोठ्या प्रमाणात कागदपत्र जप्त करत पथकाने

त्या घरातून भागीदार रितेश यांच्या भावाला सोबत घेत नवाबपुऱ्यातील फ्लॅटमध्येही गेले होते. दरम्यान जाताना पोलिस बंदोबस्तावरील वाहन आणि पोलिसांना बघून एका वृद्ध नागरिकाने ‘मी इथेच राहतो, आमच्या शेजारी काय झालंय’? अशी माध्यम प्रतिनिधींना विचारणा केली.