Chhatrapati sambhajinagar : शेतकऱ्यांची कर्जवसुली रक्कम न भरल्याने ‘दिलासा’वर गुन्हा Chhatrapati sambhajinagar farmers payment loan recovery amou | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा

Chhatrapati sambhajinagar : शेतकऱ्यांची कर्जवसुली रक्कम न भरल्याने ‘दिलासा’वर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : शेतीविषयक कर्जपुरवठा करणाऱ्या कंपनीकडून १७२ शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी हमी देत कर्ज देण्यास दिलासा संस्थेच्या संचालकाने भाग पाडले. त्यानंतर कर्जदार शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीही केली.

मात्र सदर रक्कम कंपनीत भरली नाही. याप्रकरणी कंपनीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिल्यावरून तब्बल ३७ लाख सहा हजार ५५५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिलासा जनविकास प्रतिष्ठान आणि दिलासा ॲग्रो प्रोसेसर ॲण्ड पब्लिशर्स प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

संजीव पंढरीनाथ उन्हाळे (वय ६५, रा. बी-४, प्राइड पार्क, वेदांतनगर) असे संशयित आरोपी संचालकाचे नाव आहे. जानेवारी २०१७ ते आजपर्यंत ‘दिलासा’ येथे हा प्रकार घडत होता. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतीविषयक कामांसाठी कर्जपुरवठा करणाऱ्या नेटाफिम ॲग्रिकल्चर फायनान्सिंग एजन्सी प्रा.लि.(नाफा) या कंपनीचे विधी सल्लागार सोमनाथ ढोले (वय ४१) यांनी फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार २०१३ मध्ये संशयित उन्हाळे यांनी ‘दिलासा’मार्फत १७२ गरजू शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासह विविध शेतीकामासाठी कर्जपुरवठा करण्याची शिफारस ‘नाफा’ला केली होती. तसेच सदर कर्जवसुलीची जबाबदारीही ‘दिलासा’चे व्यवस्थापकीय संचालक या नात्याने उन्हाळे यांनी घेतली होती. तसा करारही चार सप्टेंबर २०१३ मध्ये करण्यात आला होता.

अन् ‘दिलासा’ने ठेवले स्वतःकडेच

‘नाफा’ने १७२ शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केल्यानंतर कर्जवसुलीची रक्कम ‘दिलासा’ने ‘नाफा’मध्ये जमा केली नाही. दरम्यान काही सुरवातीला १६ शेतकऱ्यांनी विहित वेळेत सात लाख ४२ हजार ४११ आणि इतर ७९ शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड करून उन्हाळे यांच्याकडे २९ लाख ६४ हजार १४४ रुपये जमा केल्याची माहिती ‘नाफा’ला मिळाली,

तसेच कर्जापोटी पैसे जमा केल्याच्या पावत्याही शेतकऱ्यांनी ‘नाफा’ला दिल्या. एकूण ९५ शेतकऱ्यांकडून जमा केलेले ३७ लाख सहा हजार ५५५ रुपये कंपनीकडे जमा न करता फसवणूक केल्याप्रकरणी ‘नाफा’कडून पोलिसांत धाव घेण्यात आली होती, मात्र वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने अखेर ‘नाफा’ने १४ डिसेंबर २०२२ रोजी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

न्यायालयाकडून घटनेची शहानिशा करण्यात येऊन न्यायालयाने वेदांतनगर पोलिसांना फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दिले. त्यानुसार संजीव उन्हाळे यांच्याविरोधात चार मार्च रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे करत आहेत.