Crime News : नाचताना धक्का लागल्याने तरुणास भोसकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

knief attack

हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून पोटात चाकूने भोसकले.

Crime News : नाचताना धक्का लागल्याने तरुणास भोसकले

छत्रपती संभाजीनगर - हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून भावासोबत वाद होत असताना सोडविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाला ‘आज तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत त्याच्या पोटात चाकूने भोसकले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. ही खळबळजनक घटना सात मे रोजी रात्री साडेदहा वाजता पडेगाव येथील पोलिस कॉलनीत घडली.

याप्रकरणी गंभीर तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, नंतर घाव जास्त असल्याने गंभीर अवस्थेत त्याला अधिक उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी जखमी तरुणाचा जबाब घेत चाकूहल्ला करणाऱ्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सूरज भुजबळ (रा. छावणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की ऊर्फ विकास जनार्धन भडके (२१, रा. सावतानगर, पडेगाव) हा कार चालवून उदरनिर्वाह भागवितो. सात मे रोजी विक्की भडके याचा मित्र विक्की बोराडे याची पडेगावातील पोलिस कॉलनीत हळद असल्याने विक्की, त्याचा भाऊ आकाश भडके, मित्र सागर जंगळे, इजाज यांच्यासोबत हळदीला गेला होता.

रात्री साडेदहा वाजेदरम्यान हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत असताना आकाश याचा विक्कीचा मित्र सूरज भुजबळ याला धक्का लागला. दरम्यान, एकीकडे फिर्यादीचा भाऊ आकाश तर सूरज हा विक्कीचा मित्र असल्याने विक्की हा सुरजला समजावून सांगत होता. मात्र सुरजने काही न ऐकता विक्कीला ‘मी आज तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत चाकू काढला आणि विक्की याला काही कळण्याच्या आत त्याच्या पोटात भोसकले. गंभीर जखमी विक्की याला भाऊ आकाश, अशोक मगर यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.

गंभीर जखमी झाल्याने प्राथमिक उपचार करुन विक्की याला घाटीत दाखल करण्यात आले. या प्रकरणी सूरज भुजबळविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड करत आहेत.

टॅग्स :crimeattack