Chhatrapati sambhajinagar : भरपावसातही संपकरी ठाम ; तिसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प Chhatrapati sambhajinagar old pension Strikers firm heavy rains | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संप

Chhatrapati sambhajinagar : भरपावसातही संपकरी ठाम ; तिसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प

छत्रपती संभाजीनगर : जुनी पेन्शन योजना सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनांच्यावतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशीही गुरुवारी (ता.१६) विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. पावसाची रिपरिप सुरू असतानाही त्याची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनची आग्रही मागणी करत घोषणाबाजी केली.

संपात जिल्ह्यातील तब्बल ४० हजार कर्मचारी सहभागी झाल्याने कामकाज ठप्प आहे. गुरुवारी संपाचा तिसरा दिवस होता. दरम्यान, शासनाने संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शासनाच्या या इशाऱ्याने कर्मचारी संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले व पेन्शनसाठी घोषणा देण्यात आल्या. आंदोलन सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली मात्र या पावसाची पर्वा न करता हे आंदोलन सुरूच ठेवले.

यावेळी ‘जुनी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,’ ‘एकच मिशन, जुनी पेन्शन'' अशा घोषणा देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. देविदास जरारे, तलाठी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी, नर्सेस फेडरेशनच्या राज्याध्यक्ष इंदुमती थोरात,

सरचिटणीस एन.एस. कांबळे, वैजनाथ विघोतकर, लता ढाकणे, रामेश्वर मोहिते, सुरेश करपे, महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव महेंद्र गिरगे, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष परेश खोसरे, जितेंद्र जाधव, राहुल बनसोडे, विजय शहाणे, सतीश घनवट, मुजाहित पटेल, दिलीप त्रिभुवन आदी सहभागी झाले.

आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

राज्य शासनाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांची संपावर जाण्याची कृती बेकायदेशीर आहे.

आपल्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, या नोटीसला आम्ही उत्तर देणार नाही तसेच मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे डॉ. जरारे यांनी म्हटले.