
Chhatrapati sambhajinagar : छत्र्या, रेनकोट, स्वेटर पुन्हा बाहेर
छत्रपती संभाजीनगर : शहर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. १६) पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह अधून-मधून पावसाच्या सरी कोसळल्या. चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची ३.८ मिलिमिटर एवढी नोंद झाली. या अवकाळी पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला असून, सायंकाळचे तापमान १६ अंशांपर्यंत घटले आहे.
बुधवारपासून (ता. १५) वातावरणात बदल झाला असून, काल पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. ढगांच्या गडगडाटासह दिवसभर कधी मध्यम तर कधी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. अधून-मधून सूर्याचे दर्शनही होत होते. पावसात घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
मार्च महिना सुरू झाल्यामुळे स्वेटर, रेनकोट अनेकांनी गुंडाळून ठेवले होते, पण अवकाळी पावसामुळे अडगळीत पडलेले स्वेटर, रेनकोट, छत्र्याही बाहेर काढाव्या लागल्या आहेत. उन्हाचा पारा असतानाच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांना पुन्हा हिवाळा सुरू झाल्याचा फिल आला. दरम्यान शहरात सध्या कोरोनासह एच-३, एन-२ व्हायरसच्या रुग्णांची वाढ होत आहे.
घरोघरी ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे दवाखान्यातील गर्दी वाढली आहे. त्यात वातावरणात बदल झाल्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांचा त्रास वाढणार असल्याने चिंता वाढली आहे.
अवकाळी पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ३.८ मिलिमिटर एवढी नोंद झाली आहे. पावसासोबत गार वारे वाहत असल्याने दिवसाचे तापमान २४ अंश तर रात्रीचे तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत घटले आहे.