
Chhatrapati Sambhajinagar : आता नामांतर झाले,राजकारण नको ; खैरे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबादशी संबंध काय, असे विचारणाऱ्या खासदारांनी थोडी इतिहासाची पाने चाळावीत, मग त्यांचे कार्य त्यांना कळेल. औरंगजेब केवळ हिंदूनाच नव्हे तर मुसलमानांना छळणारा क्रूर बादशाह म्हणून ओळखला जातो.
आता शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाले असून त्यावरून राजकारण करू नका, असा सल्ला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिला.
एकदा अधिकृत नामांतर झाल्यावर इम्तियाज यांनी त्यावरून राजकारण करण्याची गरज नाही. हा विषय आता संपला आहे. छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध केला म्हणजे आपल्याला मुस्लीम मते मिळतील असे जर त्यांना वाटत असेल तर तसे होणार नाही.
औरंगजेब त्यांच्या दृष्टीने महान वगैरे होता तर मग मुस्लिमांच्या एका तरी व्यक्तीचे किंवा त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब आहे का? हिंदूमध्ये तरी संभाजी, शिवाजी ही नावे असतात. कारण हे आदर्श राजे होते, तसा औरंगजेबाचा कोणताही आदर्श नाही. तुमच्या बी टीमचे जे मालक आहेत, त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे का? असा चिमटा देखील खैरे यांनी इम्तियाज यांना काढला.