
Chhatrapati Sambhajinagar : ‘आता जिंकेपर्यंत लढायचं...’ उद्धव ठाकरे गटाचा निर्धार ; विरोधी पक्षनेते दानवे
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन जून ते २५ जून दरम्यान शिवगर्जना मोहीम आयोजित करण्यात आली असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत सांगितले.
या मोहिमेत ‘आता जिंकेपर्यंत लढायचं’ असा निर्धार केला जाणार आहे. श्री. दानवे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शिवसेना शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त एक जूनला संस्थान गणपतीची आरती करून शिवगर्जना मोहिमेला सुरवात केली जाईल. दोन, तीन जूनला गंगापूर तालुका, चार जूनला खुलताबाद, नऊ व दहा जूनला कन्नड तालुका, ११ जूनला पैठण तालुका, १६ व १७ जूनला वैजापूर तालुका, २३ जूनला फुलंब्री, सिल्लोड
, सोयगाव तालुका, २४ जूनला छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम ग्रामीण तालुक्यात शिवगर्जना मोहीम राबवली जाईल. या मोहिमेत सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत, असे दानवे यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहर प्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
आठ जूनला मेळावा
छत्रपती संभाजीनगर शाखेचा वर्धापन दिन आठ जूनला असून, या दिवशी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सहा जूनला शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा क्रांती चौक येथे साजरा केला जाईल. एक जूनला फेरी काढून शिवगर्जना मोहिमेची सुरवात केली जाईल. मोहिमेत ४५ हजार शिवसैनिकांना निमंत्रण दिले आहे. त्यांच्या माध्यमातून एक लाख शिवसैनिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे श्री. दानवे यांनी सांगितले.