
Chhatrapati Sambhajinagar : विदेशी पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत
छत्रपती संभाजीनगर : शहरात होत असलेल्या जी-२० परिषदेअंतर्गत महिला-२० परिषद आणि अजिंठा-वेरूळ महोत्सवाच्या निमित्ताने शहरात आलेल्या विदेशी पाहुण्यांचे विमानतळावर पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले.
शनिवारी (ता. २५) चिकलठाणा विमानतळावर पहिले पथक दाखल झाले. त्यात महिला-२० परिषदेच्या अध्यक्षा संध्या पुरेचा, पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक सल्लागार डॉ. शमिका रवी यांच्यासह युरोपीयन संघ, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, तुर्की आदी देशांतील महिला प्रतिनिधींसह चेरील मिलर, अमेरिकेच्या केल्सी हॅरिस यांच्यासह नार्मिया बोहलेर, सिबुलेले पोस्वायो, सेव्हिम काया, सारे ओत्झुर्क, फातिमा उर्झिक, पल्लवी पटनाईक आणि एमलॉन तिर्की या महिला प्रतिनिधींचा समावेश आहे.
विमानतळावर उतरताच विदेशी पाहुण्यांना पाणी आणि कोल्ड्रिंक्स देण्यात आले. त्यानंतर पाहुणे विमानतळाबाहेर येताच त्यांचे औक्षण करत पुष्पहार घालून जोगदार स्वागत करण्यात आले. यावेळी अंजली चिंचोलीकर यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेच्या शाळेतील नऊवारी साडीतील मुलींनी लेझीमचे सुंदर सादरीकरण केले.
काही पाहुण्यांनी मुलींकडून लेझीम हातात घेत क्षणभर ठेकाही धरला. विमानतळावर महिला-२० परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनाईक, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जंगराम कुलदीप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विमानतळ झाले सज्ज
विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर सुदर लाईटींग करण्यात आली आहे. ठिकठिकाणी वारली पेंटिंग साकारण्यात आली आहे. अजिंठा लेण्यांतील चित्रांचे भव्य पोस्टर लावण्यात आले आहे. एअरोब्रिजपासून तर आउटगेटपर्यंत कार्पेट टाकण्यात आले आहे.
पोलिसांचा ड्रेसकोड बदलला
बंदोबस्तावरील पोलिस आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या ड्रेसकोडमध्ये बदल करण्यात आला आहे. नेहमीच्या खाकी वर्दीतील पोलिसांच्या बरोबरच काळी पॅन्ट, पांढरा शर्ट आणि काळे शुज घातलेल्या महिला आणि पुरुष पोलिसांच्या गणवेशानेही यावेळी लक्ष वेधून घेतले होते.