औरंगाबादेत व्यापाऱ्यांना दिलासा, कोरोना चाचणीसाठी दिली मुदतवाढ

Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

औरंगाबाद ः ‘अँटीजेन टेस्ट’ न करता व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता.१७) दिला होता. त्यामुळे गोंधळात पडलेल्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.१८) प्रशासकांची भेट घेऊन एवढ्या कमी वेळात शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांच्या चाचण्या कशा करणार? असा प्रश्‍न केला. तासभर चाललेल्या बैठकीनंतर प्रशासकांनी सुरवातीला फक्त गर्दीच्या ठिकाणी शिबिर घेऊन चाचण्या करू व गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईसंदर्भात नरमाई दाखविली जाईल, तुम्हीच महापालिकेला सहकार्य करा, अशी गळ घातली. त्यावर समाधान व्यक्त करीत सहकार्य करण्याचे आश्‍वासन पदाधिकाऱ्यांनी दिले. 

लॉकडाउननंतर शहरात रविवार (ता.१९) बाजारपेठा पुन्हा खुल्या होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासक पांडेय यांनी शहरातील व्यापारी, फळ, भाजीपाला व किरकोळ विक्रेत्यांना अँटीजेन टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, शिबिरांचे आयोजन करून त्याठिकाणी व्यापाऱ्यांना बोलविले जाणार होते. जो कोणी टेस्ट न करता दुकाने उघडेल किंवा हातगाड्यांवर व्यापार करेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. व्यापारी, विक्रेत्यांकडील टेस्टचे प्रमाणपत्र तपासण्यासाठी ४०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरिकांनी देखील ज्यांच्याकडे चाचणी केल्याचे प्रमाणपत्र आहे, त्यांच्याकडूनच खरेदी करावी, असे आवाहनही प्रशासकांनी केले होते. शहरात सुमारे ११ हजार व्यापारी आहेत. किरकोळ विक्रेत्यांची संख्या वेगळीच. एवढ्या लोकांची चाचणी एका दिवसात कशी होणार? रविवारी दुकाने उघडायची की नाही? या गोंधळात व्यापारी सापडले. त्यामुळे शनिवारी सकाळीच व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह इतर संघटनाच्‍या सदस्यांनी महापालिकेत श्री.पांडेय यांची भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी सध्या गोंधळाची परिस्थिती असल्याचे प्रशासकांना पटवून दिले.

त्यानंतर सुरवातीच्या काळात फक्त गर्दीच्या ठिकाणीच चाचणी करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला. शहरातील मुख्य बाजापेठेसह परिसरातील १५ ठिकाणे व्यापाऱ्यांनी सुचवावीत, त्यानुसार टीम्स पाठविल्या जातील, असे श्री. पांडेय यांनी सांगितले. ज्याठिकाणी गर्दी नसते, ती दुकाने उघडण्यास हरकत नाही. कारवाईमध्ये सुरवातीला सूट दिली जाईल, असेही प्रशासक म्हणाल्याचे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी सांगितले. 
बैठकीला अध्यक्ष जगन्नाथ काळे, अजय शहा, लक्ष्मीनारायण राठी, गोपालभाई पटेल, विजय जैस्वाल, संजय कांकरिया, महावीर पाटणी, कचरू वेळंजकर, जयंत देवळाणकर यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

आमच्या सुरक्षेचे काय? 
व्यापारी, विक्रेत्यांमार्फत कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी चाचणी करण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे; मात्र व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचे काय? एखादा रुग्ण दुकानात आल्यानंतर त्याच्यापासून व्यापाऱ्यांना बाधा होणार नाही का? असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना केला. त्यावर नागरिकांच्यादेखील मोठ्या संख्येने चाचण्या सुरू आहेत, असे उत्तर प्रशासकांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com