
रेणापूर तालुक्यातील भोंदूबाबाला बेड्या
अहमदपूर : मंत्रोपचाराने शारीरिक व्याधी बऱ्या करतो असे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबास किनगाव पोलिसांनी अटक केली आहे.रेणापूर तालुक्यातील मौजे खलंग्री येथील हाकानी इस्माईल शेख (वय ४५) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. सैलानीबाबांचा भक्त आहे असे भासवून तो शारीरिक व्याधी, भूतबाधा, करणी, घरगुती भांडणे, पती-पत्नीतील भांडणे आदींवर उपचार, उपाय करतो, असे सांगत त्याने गावातील स्वगृही दहा ते बारा वर्षांपासून व्यवसाय थाटला होता. नोकरीस लावतो म्हणून या बाबाने गावातील एकाला आमिष दाखविले. लिंबू, नारळ उतरवून त्याच्याकडून पैसे उकळले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संबंधिताने लातूरला अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. समितीचे प्रधान सचिव माधव बावगे, कार्यवाह रुक्साना इम्रान सय्यद, लातूर शाखेचे सुधीर भोसले, रणजित आचार्य, दगडू पडिले यांच्यासह अहमदपूरचे पोलिस निरीक्षक चितंबर कामठेवाड, किनगावचे सहायक निरीक्षक शैलेश बंकवाड आदी भोंदूबाबाच्या घरी गेले. यातील एकाने पोटाचा आजार असल्याचे सांगितले. त्यावेळी बाबा नारळ, लिंबू, जडीबुटी देऊन परतवाऱ्या करण्याचा सल्ला दिला.
कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना उपचार करीत असल्याने स्पष्ट झाल्याने गुरुवारी (ता.१०) बाबाविरुद्ध गुन्हा नोंद झाला. त्याला अटक करण्यात आली. यावेळी दानपेटीतील ४ हजार ३३२ रुपये, अंगझडतीत मिळालेले ५ हजार रुपये, कुंकू, नारळ, लिंबू, काळा दोरा, धातूची घोड्याची मूर्ती, देणगी पुस्तक, अगरबत्ती पुडे, चाकू आदी साहित्य जप्त करण्यात आले.
अघोरी उपचार
सैलानीबाबांच्या नावाने मंत्रोपचार करीत भोंदूबाबा अगरबत्ती जाळून, लिंबू भारून ते व्याधिग्रस्ताच्या डोक्यावर कापत असे. व्याधिग्रस्तांच्या अंगातील भूत काढतो असे भासवून लिंबू डोळ्यात पिळण्यासारखे अघोरी उपचार तो करी. दुर्धर आजारावरही याच पद्धतीने उपचाराचे आमिष तो दाखवी. उपचारासाठी तो धातूची पेटी, ताईत, घोरवडी येथील देवस्थानच्या फोटोचाही वापर करी, असे सांगण्यात आले.
Web Title: Crime Bhondubabala Arrested In Renapur For Fraud Case Latur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..