औरंगाबाद : सुरक्षारक्षक एजन्सीचालकावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update attack on security agency operator aurangabad
औरंगाबाद : सुरक्षारक्षक एजन्सीचालकावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

औरंगाबाद : सुरक्षारक्षक एजन्सीचालकावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ई-टेंडरमध्ये बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मागे का घेत नाही, म्हणून पाच ते सहा जणांनी सुरक्षारक्षक एजन्सीचालकाला भररस्त्यात अडवत कारची तोडफोड करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार महावीर चौक परिसरात २७ मार्चला रात्री पहाटे घडला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला. नागोराव काळे, जयकुमार काळे, विनय रेवा बडे, ओम प्रकाशसिंग अशी त्या आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारभारी रामकिसन जाधवर (४४, रा. पारिजातनगर, एन-४, सिडको) हे सुरक्षारक्षकांची एजन्सी चालवितात. २७ मार्चला रात्री साडेदहा वाजता ते कारने (एमएच २०, ईई ४०४१) एमआयडीसी वाळूज येथे सेक्युरिटी गार्ड तपासणीसाठी गेले होते. तेथील काम आटोपून २८ मार्चच्या पहाटे ते कारने घराकडे निघाले. महावीर चौकातील पेट्रोल पंपाजवळ पाच ते सहाजण अचानक आडवे आले. कार थांबताच आरोपी नागोराव काळे, जयकुमार काळे, विनय बडे, ओम प्रकाशसिंग, दोन अनोळखी यांनी दगडफेक केली. त्यात समोरील व पाठीमागील काचा फोडल्या. बोनेटवर दगड मारले. जयकुमार काळे व ओम प्रकाशसिंग यांनी जाधवर यांना कारबाहेर ओढून मारहाण केली. दरम्यान, जाधवर यांच्या खिशातील १४ हजार रुपये आणि गळ्यातील पाच तोळ्यांची सोनसाखळी सहा जणांनी हिसकावली. या प्रकारानंतर जाधवर यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठले. मात्र, जाधवर जखमी असल्याने पोलिसांनी त्यांना उपचारासाठी घाटीत पाठवले. उपचार घेऊन परतलेल्या जाधवर यांची शुक्रवारी क्रांतीचौक पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. पुढील तपास उपनिरीक्षक छोटूराम ठुबे करत आहेत.

उपकुलसचिवांसह लेखापालांवर आरोप

जाधवर यांनी त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पेट्रोल पंपाच्या दिशेने पळ काढला, आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून काही लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. फिर्यादी कारभारी जाधवर यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन सादर केले. त्यात आरोपींपासून जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठातील उपकुलसचिव जयश्री राजेश सूर्यवंशी व लेखापाल जाधव यांनी कटकारस्थान करून हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जाधवर यांच्या पत्नीच्या नावे एलीक्झर हॉस्पिटॅलिटी अँड सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनी आहे. या कंपनीची सत्यप्रत मागविण्यासाठी त्यांनी वारंवार उपकुलसचिव सूर्यवंशी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांना कागदपत्रे वेळेवर मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांचे जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील टेंडरचे काम डावलण्यात आले. तर जाधवर यांच्या एस. एम. के. ग्लोबल सेक्युरिटी इंडिया प्रा. लि. या कंपनीने सहा वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे काम केले आहे. या कंपनीच्या आगाऊ एक लाख रकमेच्या बिलातून प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये काढण्यात आले. कंपनीने केलेल्या करारनाम्यानुसार, दरवर्षी पाच टक्के इन्क्रिमेंट व चार आठवड्यांच्या पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, उपकुलसचिव सूर्यवंशी यांनी दोनदा धमकावल्याचे जाधवर यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

उपकुलसचिवांच्या पतीने पैसे उकळल्याचा आरोप

उपकुलसचिवांचे पती राजेश सूर्यवंशी यांनी महत्त्वाचे प्रॉपर्टीचे काम असल्याचे सांगत जाधवर यांच्याकडून दोन महिन्यांसाठी साडेसात लाख रुपये उसने घेतले. आता या घटनेला दोन वर्षे उलटून गेली आहेत. जाधवर यांनी वेळोवेळी सूर्यवंशी यांच्याकडे पैशांची मागणी केली. परंतु तुझे माझ्याकडे कशाचे पैसे आहेत, यानंतर मला पैसे मागायचे नाहीत असे म्हणत हाकलून लावल्याचेही जाधवर यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Crime Update Attack On Security Agency Operator Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top