Aurangabad : चालक, डिझेलविना रुग्णवाहिका धूळखात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

चालक, डिझेलविना रुग्णवाहिका धूळखात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा : ग्रामीण भागात रुग्णवाहिकेची कमतरता असल्याने याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत असल्याने पालकमंत्री तथा ऊर्जामंत्र्यांनी त्यांच्या विभागामार्फत ‘मिशन लसीकरण’ मोहिमेंतर्गत रुग्णवाहिका तर उपलब्ध करून दिल्या, पण त्या चालविणारे चालक व डिझेल उपलब्ध होत नसल्याने त्या धूळखात पडून असल्याने नागरिकांना सेवा देण्यापेक्षा फक्त खरेदी प्रक्रियेतील कमिशन खाण्यासाठी खरेदी केल्याचा आरोप काटोल पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपचे जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष संदीप सरोदे यांनी केला.

रुग्णवाहिका आवश्यक असल्याने ऊर्जा मंत्रालयांतर्गत महापारेषन कंपनीने नागपूर विभागासाठी २०० रुग्णवाहिका आरोग्य विभागाला उपलब्ध करून दिल्या. यातील दोन रुग्णवाहिका नरखेड तालुक्यातील मोवाड व सावरगाव, तर दोन काटोल तालुक्यातील येनवा व कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळाल्या. पण या रुग्णवाहिका चालविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे चालकच नाही. रुग्णवाहिका ज्यावर चालते त्या डिझेलसाठी निधीच उपलब्ध नसल्याने त्या तशाच धूळखात पडून आहेत. याचा लाभ ग्रामीण जनतेला होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. या रुग्णवाहिका खास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या लसीच्या लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागाला देण्यात आल्या असल्या तरी मात्र गावागावात आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे दुचाकीने जाऊन लसीकरण करीत आहेत.

‘मिशन लसीकरण'' अंतर्गत मोठा गाजावाजा करत ऊर्जा विभागाने सीएसआर फंडातून नागपूर विभागातील सर्व तालुक्यांसाठी २०० रुग्णवाहिका वितरित केल्या होत्या. मात्र रुग्णवाहिका चालवायला चालक नसल्याने व डिझेल भरायला पैसे नसल्याने या सर्व रुग्णवाहिका बहुतांश तालुका रुग्णालयांमध्ये धूळखात उभ्या आहेत. नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर बहुतांशी तालुक्यात हेच दृश्य आहे.

काटोल तालुक्यासाठी दोन रुग्णवाहिका मिळाल्या होत्या. त्या दोन्ही मागच्या दोन महिन्यापासून एका जागी उभी आहे. एक येनवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उभी आहे, तर दुसरी कोंढाळी आरोग्य केंद्रात उभी आहे. या रुग्णवाहिका धूळखात पडून असल्याने नागरिकांना सेवा देण्यापेक्षा फक्त खरेदी प्रक्रियेतील कमिशन खाण्यासाठी या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली.

-संदीप सरोदे, माजी सभापती, पंचायत समिती, नरखेड

प्राथमिक आरोग्य केंद्राचे चालक हेच या रुग्णवाहिका चालवित आहेत. तसेच डिझेलची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत केली जात आहे. यामुळे नरखेड तालुक्यातील रुग्णवाहिका या लसीकरणच नाही तर अन्य कामासाठी उपयुक्त ठरत आहे.

-डॉ. विद्यानंद गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी, नरखेड

loading image
go to top