Bogas School News : जिल्ह्यातील सहा बोगस शाळांवर शासनाचा हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education State Government action on six bogus schools Chhatrapati Sambhaji Nagar

Bogas School News : जिल्ह्यातील सहा बोगस शाळांवर शासनाचा हातोडा

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अनधिकृत शाळांबाबत पालकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी तक्रारी केल्याने शासनाने शाळा तपासणीची मोहीम हाती घेतली होती. या तपासणीत राज्यात ६९० अनधिकृत शाळा आढळल्या असून त्यापैकी २०० शाळा शासनाने बंद केल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. त्यामध्ये जिल्ह्यातील सहा शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

विविध कॉर्पोरेट संस्थांसह व्यावसायिक व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रात शाळांचे बाजारीकरण चालविले होते. यामध्ये जादा दराने शुल्क आकारणे, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे, शाळांमध्ये गणवेश, शैक्षणिक साहित्य विकणे, शाळा चालविणाऱ्या संस्थाचालकांची मनमानी असे प्रकार घडत होते. यामुळे शासन दरबारी अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेऊन शासनाने शाळा तपासणी मोहीम हातात घेतली. या शाळा तपासणी मोहिमेमध्ये अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक खुलासे बाहेर आले आहेत. त्यात शासन मान्यता नसणे, मंडळांच्या शाळांकडे एनओसी, संलग्नता प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले होते.

त्यानुसार जिल्ह्यात सहा शाळा अनधिकृतपणे सुरु असल्याचे आढळून आले होते. त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण ६९० अनधिकृत शाळा असून २०० शाळा शासनाने बंद केल्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्रात म्हटले आहे.

२५ एप्रिलनंतर कारवाई

राज्यात जवळपास आठशेहून अधिक बोगस शाळांवर कारवाईचा हातोडा पडणार आहे. याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व उपसंचालकांना संबंधित शाळांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या शाळांवर शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे दंड आकारणे,

एफआयआर गुन्हा दाखल करणे, शाळा बंद करणे आदी कारवाई ता. २५ एप्रिलपूर्वी करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट आदेश आहेत. सध्या राज्यभर खासगी इंग्रजी शाळांची तपासणी सुरु आहे. तपासणीनंतर अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांवर शासनाकडून कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :educationschool