लग्नानंतरही गावातील मुलीवर प्रेम केलं पण जीवावर बेतलं; विवाहित तरुणाचा खून | Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Crime News : लग्नानंतरही गावातील मुलीवर प्रेम केलं पण जीवावर बेतलं; विवाहित तरुणाचा खून

सिल्लोड : प्रेमप्रकरणातून चार जणांनी मिळून विवाहित तरुणाचा खून केला. ही घटना मंगरूळ (ता.सिल्लोड) गावात बुधवार (ता.१७) रोजी दिवसाढवळ्या साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मृत तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून चार संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून, तीन जणांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळ येथील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या मृताची आई आनंदाबाई बोरडे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. मुलाचे लग्न झाले असून, त्याचे गावातील एका मुलीसोबत मागील एक वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.

या कारणावरून त्याची पत्नी व मुले सहा महिन्यांपासून गाव सोडून गेले होते. बुधवार (ता.१७) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत समाधान बोरडे (वय २५) याने त्याच्या आईस बाहेर जाऊन येतो असे म्हणून गेला. काही वेळाने त्यांना फोन आला की, त्यांच्या मुलाचे काही जणांसोबत भांडण सुरू आहे. माहिती मिळताच त्या घटनास्थळी आल्या असता समाधान गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता.

त्यांनी त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने त्यास मारहाण केलेल्यांची नावे सांगितली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विकास आडे, सचिन सोनार, अनंत जोशी, राजेंद्र काकडे, सचिन काळे, रामेश्वर जाधव यांनी घटनास्थळी पोचून जखमी असलेल्या समाधान यास सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी गौतम भिका दामोधर, समाधान भिका दामोधर, देविदास भिका दामोधर अन्य एका जणावर गुन्हा दाखल केला. यातील तीन आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली.

काही दिवसांपूर्वी झाला होता वाद

याच कारणावरून सोमवारी (ता.१५) संशयित आरोपी व मृत समाधान यांच्यात वादविवाद झाला होता. संशयित आरोपींनी मृताच्या घरासमोर येऊन मोटारसायकलचा हॉर्न का वाजवितो असे विचारून त्यास मारहाण केली होती. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती.

टॅग्स :policecrimemurder