वाळूजमध्ये सिलिंडर पेटले, दोन घरे खाक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाळूज (जि. औरंगाबाद) - स्वयंपाक झाल्यानंतर घरातील सिलिंडरमधून गॅसगळती झाल्याने दोन घरांना आग लागल्याची घटना गुरुवारी (ता. पाच) सकाळी साडेदहाच्या सुमारास वाळूज येथील साठेनगरात घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसून, घरातील रोख ५ हजार रुपये व लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. 

प्रकाश सखाराम शेरे (वय ५२, रा. साठेनगर, वाळूज) यांचे चार रुमचे पत्र्याचे घर आहे. त्यातील एका घरात प्रकाश लक्ष्मण पाचरणे (वय ५५) हे भाड्याने राहतात. गुरुवारी (ता. पाच) सकाळी प्रकाश पाचरणे व त्यांची पत्नी कामाला गेले होते. तर त्यांची आई तुळसाबाई (वय ६५), मुलगी काजल (वय १५), अंजली (वय १३) व रोहित (वय ९) असे चारजण घरी होते.

मुलगी काजलने स्वयंपाकघरात सकाळचे जेवण बनविल्यानंतर समोरच्या घरात येताच गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे घरातून मोठा धूर निघाला. यावेळी आजी तुळसाबाई यांनी प्रसंगावधान राखत घरातील सर्वांना बाहेर काढले. क्षणातच आगीने घराला विळखा घातला. ही आग शेजारच्या शेरे यांच्या घरातही पसरली. ही माहिती अग्निशमन दलाला देताच तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील टीव्ही, फ्रीज, कपाट, कपडे, रोख ५ हजार रुपये व सर्व संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले होते. या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. 

परिचराची मुख्याध्यापकांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी 
 

औरंगाबाद - उर्दू शाळेतील परिचराने मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी व शिक्क्याची बनावट कागदपत्रे बँकेला सादर करून कर्जासाठी दोघांना जामीनदार राहिला. त्याला मुख्याध्यापकांनी जाब विचारताच आत्महत्या करून गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली. याप्रकरणी परिचराविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने सातारा पोलिसांत बुधवारी (ता. चार) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शेख फैज शेख बशीर (रा. बारी कॉलनी, रोशन फंक्शन हॉल, रोशन गेटजवळ) असे संशयिताचे नाव आहे. सादातनगरातील कोईतूर उर्दू हायस्कूलमध्ये शेख फैज शेख बशीर हा प्रयोगशाळा परिचर आहे. २०१६ मध्ये दोन व्यक्तींना हव्या असलेल्या पंधरा लाखांच्या कर्जासाठी शेख फैज जामीनदार राहिला. त्याने दोघांना मुख्याध्यापक मोहम्मद अशरफोद्दीन मोहम्मद युसुफोद्दीन (४३, रा. टाइम्स कॉलनी, कटकट गेट) यांच्या बनावट सही व शिक्क्यांची कागदपत्रे जामीनदार म्हणून दिली. हा प्रकार मुख्याध्यापक मोहम्मद अशरफोद्दीन यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी फैजला जाब विचारला. त्यावरून फैजने त्यांना स्वत: आत्महत्या करून गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर अशरफोद्दीन यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याबाबत चौकशी करून फैजविरुद्धध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तपास आता सहायक पोलिस निरीक्षक कराळे करीत आहेत. 
 


घर फोडून दागिने, रोकड लंपास 

औरंगाबाद - भरदिवसा महिलेचे घर फोडून चोरांनी सात तोळ्यांचे दागिने आणि दहा हजारांची रोकड लांबविली. ही घटना बुधवारी (ता. चार) दुपारी रेल्वेस्थानक भागात घडली. याबाबत ४२ वर्षीय महिलेने तक्रार दिली. त्या मुलीसह बाहेर गेल्याची चोरांनी संधी साधून दुपारी बारा ते पाचच्या सुमारास घर फोडून कपाटाच्या लॉकरमधील पाच तोळ्यांचे दोन मंगळसूत्र व दहा हजारांची रोकड असा दोन लाखांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी बुधवारी रात्री वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करीत आहेत. 


 
जुन्या भांडणातून दगड मारला 

औरंगाबाद - जुन्या भांडणातून महिलेने घरावर दगड मारला. हा प्रकार बुधवारी दुपारी सिडको भागात घडला. ४० वर्षीय महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने जुन्या भांडणातून व घरातील टीव्ही जळण्यास एका महिलेला जबाबदार धरून तिला शिवीगाळ करून घरावर दगड मारला. त्यावरून दगड मारणाऱ्या महिलेविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक नलावडे करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com