औरंगाबाद : बेकायदा नळ लवकरच बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water

औरंगाबाद : बेकायदा नळ लवकरच बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील बेकायदा नळांचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. बेकायदा नळांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते. पण महापालिकेला हे नळ शोधून बंद करता आलेले नाहीत. आता नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे अनेक भागातील बेकायदा नळ आपोआप बंद होणार आहेत. नव्या पाणीपुरवठा योजनेत सुमारे १९०० किलोमीटरची पाइपलाइन शहरात टाकली जाणार आहे. त्यात ७०० किलोमीटरचे जुने पाइप बदलले जाणार आहेत. लाइन बदलल्यानंतर महापालिकेची परवानगी असलेले नळच नव्या लाइनवर जोडले जातील, त्यामुळे बेकायदा नळांचा प्रश्‍न आपोआप संपेल, असे सूत्रांनी सांगितले.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या १,६८० कोटी रुपयांच्या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे. १३०८ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. १८ टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, दोन पाणी साठवण टाक्या, अशी कामे सध्या सुरू आहेत. मुख्य पाइपलाइनच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान ज्या भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत, तिथे अंतर्गत पाइपलाइन देखील टाकली जात आहे. या योजनेत सुमारे २१०० किलोमीटरच्या अंतर्गत जलवाहिन्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

महापालिकेने गेल्या काही वर्षांत टाकलेल्या तसेच समांतर पाणीपुरवठा योजनेत झालेल्‍या पाइपलाइन वगळल्यानंतर शहरात सुमारे १९०० किलोमीटरची पाइपलाइन होईल, असा अंदाज बांधला जात आहे. अनेक भागात अद्याप सिमेंटचे पाइप आहेत. त्यासह सुमारे ७०० किलोमीटरचे जुने पाइप काढून त्याठिकाणी नवे पाइप टाकले जाणार आहेत. हे काम झाल्यानंतर नागरिकांना नव्याने कनेक्शन देताना ते महापालिकेची परवानगी घेऊन घेतले आहे का? याची तपासणी केली जाईल. ज्यांच्याकडे परवानगी असेल त्यांनाच कनेक्शन दिले जाईल, त्यामुळे शहरातील बेकायदा नळांचा प्रश्‍न काही अंशी मिटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बेकायदा नळांची संख्या लाखाच्या घरात

शहरातील बेकायदा नळांची संख्या लाखापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या ताब्यात महापालिकेने पाणीपुरवठा योजना दिली होती. त्यावेळी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात लाखाच्या वर बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते.

loading image
go to top