आजपासून आयटीआय प्रवेश नोंदणीला सुरुवात

मराठवाड्यात २० हजार ६१६ जागा
 ITI Admission
ITI Admission sakal media

औरंगाबाद : दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे, सोबतच विद्यार्थ्यांना आयटीआय ऑनलाईन प्रवेश नोंदणी देखील सुरु होणार आहे. यंदा प्रवेश जलद आणि सुरुळीत होण्यासाठी शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व प्राचार्यांना ऑगस्ट २०२२ सत्रातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेबाबतची माहितीपुस्तिका, नियमावली व कार्यपद्धती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक आयटीआयवर विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी माहितीदर्शक फलक तसेच अन्य साधने वापरावीत अशा सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आल्या आहेत.

मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत सध्या इंडस्ट्रीला प्रशिक्षित कारागिरांची मोठी गरज भासत आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाने स्कूल कनेक्ट उपक्रम राबविला होता. या उपक्रमातून दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयनंतर मिळणारी संधी, नोकरी, कौशल्य, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, रोजगारांची संधी आदींची माहिती दिली होती.

तसेच आयटीआयनंतर अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षणाचा देखील पर्याय खुला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत, असे आवाहन संचालनालयातर्फे करण्यात आले होते. दरवर्षी आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. गत शैक्षणिक वर्षात मराठवाड्यातील शासकीय आयटीआयमध्ये ९८ टक्के; तर खासगी आयटीआयमध्ये ६० टक्क्यांपर्यंत प्रवेश झाले होते. संचालनालयाकडून यंदाही प्रवेशात मोठी वाढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदा मराठवाड्यातील ८२ शासकीय आयटीआयमध्ये १४ हजार, तर ५७ खासगी आयटीआयमध्ये पाच हजार ६०८ अशा एकूण २० हजार ६१६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com