Hingoli : तांदूळ, गव्हाचे दर वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli : तांदूळ, गव्हाचे दर वाढले

Hingoli : तांदूळ, गव्हाचे दर वाढले

हिंगोली : खरीप हंगामात भाताच्या लागवडीत झालेली घट आणि अतिवृष्टीमुळे तांदळाचे उत्पादन तब्बल ८० ते ९० लाख टनांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे तांदळाच्या किमतीत वाढ झालेली आहे. गेल्या आठ दिवसांत तांदळाच्या दरात प्रति किलो २ ते तीन रुपयांची वाढ झालेली आहे. भाववाढीने सर्वसामान्यांच्या ताटातील भातासाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. याशिवाय गहू आणि खाद्य तेलाच्या दरातही वाढ झालेली आहे.

तीन महिन्यांपासून घसरत असलेला किरकोळ महागाईचा दर पुन्हा वाढू लागला आहे. आगामी काळात महागाई उच्च पातळीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी जून-सप्टेंबरमधील अनियमित पाऊस आणि परतीच्या नैऋत्य मोसमी पावसाने केलेल्या शेतातील पिकांच्या नुकसानीचा फटका भातपिकाला बसला आहे.

त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने भाव वाढले आहे. मागील आठवड्यात ४० ते ४२ रुपये किलो असलेला तांदूळ आता ४४ ते ४६ रुपयांवर गेला आहे. २०२१-२२ मध्ये भारताचे तांदूळ उत्पादन १३.०२९ कोटी टन होते. जे एका वर्षापूर्वी १२.४३७ कोटी टन होते. यंदाच्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ८० -९० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

गव्हाचे दरही वाढले

देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. भारतात अन्नधान्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये अन्नधान्याच्या महागाईने १०५ महिन्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे. त्याच वेळी, देशातील धान्य साठा पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे.

सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये गव्हाचा साठा गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या लढाईमुळे भारताने अनेक देशात एक लाख कोटी टनापेक्षा अधिकचा गहू अनेक देशात पाठविला. त्यामुळे देशातील गोदामांमध्ये गव्हाचा साठा कमी झाल्याने भाव वाढ होत असल्याचे धान्य व्यापारी लक्ष्मीकांत व्यवहारे यांनी सांगितले.

खाद्य तेलाचे दरात वाढ

मोदी सरकारने खाद्य तेलांचे दर नियंत्रणात राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इन-डायरेक्ट अँड कस्टमने तेलाचे वाढते दर रोखण्यासाठी आयातीवरील सीमा शुल्कातील सवलत कायम ठेवली आहे. सणासुदीच्या काळात देशात खाद्य तेलाचा वापर वाढतो. या कालावधीत तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसतो. आयात तेलावर देण्यात आलेली सीमा शुल्क सूट मार्च २०२३ पर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. तरीही दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर खाद्य तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. गेल्या वीस दिवसांत खाद्य तेलाच्या दरात १५ रुपयांची वाढ झाली असल्याचे श्री व्यवहारे यांनी सांगितले.