औरंगाबादेतील वक्फचे कार्यालय मुंबईला पळविण्याचा घाट 

औरंगाबादेतील वक्फचे कार्यालय मुंबईला पळविण्याचा घाट 

औरंगाबाद : मराठवाड्याच्या वाट्याला येणाऱ्या केंद्राच्या आणि राज्याच्या संस्था एकानंतर एक विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात पळविल्यानंतर आता औरंगाबादेतील पाणचक्कीत असणारे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे कार्यालयही मुंबईत पळविण्याचा घाट घातला जात आहे. डिसेंबर २०१९ मध्ये मुंबईला कार्यालय स्थलांतरित करण्याचा ठराव पास केल्यानंतर आता यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत.

अगदी १९६० पासून मराठवाडा वक्फ बोर्ड आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड अस्तित्वात आल्यापासून हे कार्यालय औरंगाबादेत आहे. राज्यात वक्फ बोर्डाच्या २३ हजार ५६६ मालमत्ता असून, पैकी तब्बल १५ हजार ८७७ मालमत्ता या एकट्या मराठवाड्यात आहेत.

राज्यात वक्फ बोर्डाची ३७ हजार ३३० हेक्टर जमीन आहे. त्यापैकी २३ हजार १२१ हेक्टर जमीन ही मराठवाड्यात असतानासुद्धा हे कार्यालय मुंबईत पळविण्याचा ठराव करण्यात आला. मात्र बहुतांश वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी हे कार्यालय मुंबईला पळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

१९६० मध्ये मराठवाडा वक्फ बोर्ड 

अगोदर हैदराबाद संस्थान असलेल्या मराठवाड्यात १९६० मध्ये मराठवाडा वक्फ बोर्ड अस्तित्वात आल्यानंतर ७ एप्रिल १९६० रोजी शेखलाल पटेल यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. त्यानंतर फकरुद्दीन यांची २३ मे १९६५ ते ३० एप्रिल १९६६ पर्यंत नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर वली मोहम्मद खान, गुलाम दस्तगीर खान यांनी काम पाहिले. ४ मार्च १९७९ ते १८ नोव्हेंबर १९८४ पर्यंत प्रशासक होता. यानंतर मोहम्मद सफदर अली देशमुख, इफ्तेकार हुसैन, सय्यद फारुख पाशा, अब्दुल रशीद काझी, खान इक्बाल पाशा, अब्दुल रशीद काझी असे दहा चेअरमन राहिले. 

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड असल्यापासून कार्यालय शहरात 

मराठवाडा वक्फ बोर्डाऐवजी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड करून त्याच्या पहिल्या अध्यक्षपदी २ जून २००३ रोजी डॉ. मोहम्मद अजीज यांची नियुक्ती झाली. त्यांनी २० ऑगस्ट २००७ पर्यंत कामकाज पाहिले. त्यानंतर बोर्डाला अध्यक्ष नव्हता. ६ ऑगस्ट २०१६ मध्ये एम. एम. शेख यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. यानंतर त्यांनी ८ नोव्हेंबर २०१७ मध्ये पद सोडले होते. सुरवातीपासून वक्फचे कार्यालय औरंगाबादेतच आहे.

हेही वाचा - अंडी अबवणुक केंद्रात आता कावेरी जातीचे पिलं

कोट्यवधींच्या मालमत्तेवर अतिक्रमण 

दर्गा, मशीद, इनामी जमीन, मशीद इनाम, आशुरखाने, कब्रस्तान, ईदगाह अशी कोट्यवधींची मालमत्ता वक्फकडे आहे. या मालमत्तेतून येणाऱ्या मिळकतीतून गरीब व गरजू व्यक्तींना मदत केली जावी, अशी तरतूद आहे. तसेच या मालमत्तांच्या देखभालीची जबाबदारी वक्‍फकडे आहे. यासाठी १९९५ यावर्षी सुधारित वक्‍फ ॲक्‍ट अस्तित्वात आला. तरीही वक्फच्या जमिनीवरील अतिक्रमण वाढत चालले आहे. यामधील अनेक प्रकरणे वक्‍फ न्यायाधिकरणात प्रलंबित असलेली दिसून येतात. 

महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाच्या मालमत्ता 

विभाग.......................वक्‍फ मालमत्ता.....................एकूण जमीन हेक्‍टरमध्ये 
औरंगाबाद ...............१५८७७.................................२३१२१ 
कोकण.......................१७२४.................................२३३९ 
पुणे............................२७२८................................३७२४ 
नाशिक.........................१४५५................................३३४० 
अमरावती......................१३१०................................११०२ 
नागपूर..........................४७०.................................३७०४ 
एकूण..........................२३५६६..............................३७३३० 

ज्या-ज्या वेळी मुंबईला हे कार्यालय घेऊन जाण्याचा ठराव आला त्याला मी विरोध केला. आजसुद्धा माझा याला विरोध आहे. सर्वाधिक संपत्ती ही मराठवाड्यात आहे. औरंगाबाद हे महाराष्ट्रात सेंटरला असल्याने हे कार्यालय मुंबईला घेऊन जाण्यास आमचा विरोध आहे. मात्र, सदस्य बहुमताने ठराव करून हे कार्यालय मुंबईला जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 
- एम. एम. शेख, वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष 

वक्फची सर्वाधिक संपत्ती मराठवाड्यात असतानाही मुंबईत हे कार्यालय कशासाठी घेऊन जात आहेत? लोकांना मुंबईला येणे-जाणे परवडणारे नाही. येथे सर्व कागदपत्रे सुरक्षित आहेत. कुणाच्या तरी घशात मालमत्ता घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. अल्पसंख्याक मंत्र्यांना निवेदनसुद्धा दिले आहे. 
- मोहसीन अहमद, अध्यक्ष, जनजागरण समिती 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com