ITI Admission : मराठवाड्यात आयटीआयसाठी यंदा २२ हजार १२० जागा; १२ जूनपासून प्रवेश प्रक्रिया होणार सुरू marathwada 22120 seats for iti education admission process start from 12th june | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ITI

ITI Admission : मराठवाड्यात आयटीआयसाठी यंदा २२ हजार १२० जागा; १२ जूनपासून प्रवेश प्रक्रिया होणार सुरू

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यातील ८२ शासकीय आणि ६२ खासगी आयटीआयमध्ये यंदा विविध ट्रेंडसाठी तब्बल २२ हजार १२० जागा उपलब्ध आहेत. येत्या १२ जूनपासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती अभिजित अल्टे यांनी दिली. आयटीआयमध्ये यंदा ८३ विविध प्रकारच्या ट्रेडसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.

त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर इत्यादींसारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. मराठवाड्यातील सरकारी आयटीआयमध्ये १५ हजार २०० आणि खासगी आयटीआयमध्ये ६ हजार ९२० अशा एकूण २२ हजार १२० जागा उपलब्ध आहेत.

दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण (एटीकेटी) अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक आर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक आर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्राची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. त्यामुळे परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन अल्टे यांनी केले.

प्रवेश क्षमतेत वाढ

मागील वर्षीपासून छत्रपती संभाजीनगर शासकीय आयटीआयमध्ये ऑपरेटर ॲडव्हॉंन्स मशीन टूल, टूल ॲण्ड डायमेकर, संधाता या ट्रेडचे प्रत्येकी दोन युनिट वाढविण्यात आले होते. त्यामुळे तब्बल १२० जागांमध्ये यंदा वाढ झाली होती. तसेच शासकीय आयटीआयमध्ये अजून ८ युनिट स्थापन करण्यास देखील संमती देण्यात आली आहे. त्यामुळे अजून १७२ जागांमध्ये वाढ होणार आहे. यावर्षी फिटर ट्रेडचे एक तुकडी वाढविण्यात आल्याने २० जागांमध्ये आणखी वाढ झाली आहे.