
Marathwada Muktisangram 2023 :क्रीडा क्षेत्रात बदलता मराठवाडा
मराठवाडा निजामाच्या राजवटीतून १७ सप्टेंबर १९४८ मध्ये स्वतंत्र झाला. हैदराबाद मुक्तिसंग्रामच्या लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देऊन निजामाच्या जोखडातून हा भाग मुक्त केला. १९६० मध्ये भाषिक राज्य निर्माण झाली, त्यावेळी मराठवाडा विनाअट महाराष्ट्रात सामील झाला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव साजरा करत असून, गेल्या ७५ वर्षांत मराठवाड्यातील क्रीडा विभागाची प्रगती समाधानकारक म्हणावी लागेल. कबड्डी, कुस्ती आणि व्हॉलिबॉल या खेळांमध्ये मराठवाड्यातील खेळाडूंचे प्राबल्य होते. व्हॉलिबॉलमध्ये विशेषत: लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि नांदेड या जिल्ह्यातील खेळाडूंचे आणि संघांचे महाराष्ट्रात वर्चस्व होते.
प्रमोद माने
शहरी भागात दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होतात. मात्र, ग्रामीण महाराष्ट्र अद्यापही अशा सुविधांपासून दूर आहे. तेथे क्रीडासंस्कृती रुजविणे, खेळाडू घडविणे आणि विविध स्पर्धांचे आयोजन करणे ही महाकठीण गोष्ट. ग्रामीण भागात मुलांना खेळण्यासाठी पाठविण्याला पालकांचाही विरोध असतो.
मैदान वगळता फारशा सुविधा, साहित्य उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत मुलांमधील क्रीडागुण ओळखून त्यांना प्रशिक्षण देऊन स्पर्धांसाठी तयार करणे, हे काम जिकिरीचे आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे क्रीडा महर्षी शिवाजीराव नलावडे, अहमदपूरचे गणपतराव माने यांनी महाराष्ट्राला अनेक व्हालिबॉलपटू दिले. व्हॉलिबॉलमध्ये नांदेडच्या खेळाडूंचेही वर्चस्व होते.
महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरचे डॉ. दत्ता पाथ्रीकर यांनी महाराष्ट्रातर्फे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा गाजवली आहे. महाराष्ट्राने कबड्डीमध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. या संघात डॉ. दत्ता पाथ्रीकर यांचा समावेश होता. त्यानंतर ते कार्याध्यक्ष असताना महाराष्ट्राने तब्बल ३ दशकांनंतर राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये नाना बापट यांनी खऱ्या अर्थाने कबड्डीला न्याय दिला. नाना बापट हे स्वत: चांगले कबड्डी प्रशिक्षक होते. नाना बापट यांच्यामुळे कबड्डीची एक मोठी फळी मराठवाड्यात निर्माण झाली. दत्ता पाथ्रीकर, विजय पाथ्रीकर, मधुकर बक्षी यांनी कबड्डी गाजवली. मराठवाड्यामध्ये ७० च्या दशकामध्ये सर्व खेळांच्या जिल्हा संघटना अस्तित्वात आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये १९७३-७४ मध्ये सर्व जिल्हा क्रीडा संघटनांना आकार मिळाला.
कुस्तीमध्ये बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. कुस्तीमध्ये रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदारानंतर लातूर जिल्ह्यातील साईचे काका पवार यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. हरिश्चंद्र बिराजदार हे मराठवाड्याचे गुणवंत मल्ल आणि पुण्यातील गोकूळ वस्ताद तालमीचे प्रमुख.
निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगडचे हरिश्चंद्र बिराजदार हे रहिवासी. तब्बल साडेतीन दशके त्यांनी माती आणि गादीवरच्या कुस्तीच्या तंत्रात मराठी मल्लांना तयार केले. बिराजदार यांना १९६९ मध्ये हिंद केसरी, १९७० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, १९७१ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार, १९७२ मध्ये रुस्तम ए हिंद, १९९८ मध्ये दादोजी कोंडदेव पुरस्कार तर, २००६ मध्ये सर्वोच्च ध्यानचंद पुरस्कारही मिळाला.
बिराजदारांचा वारसा काका पवार यांनी पुढे चालवला. काका पवार यांनी देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ३१ पदके मिळवून दिली आहेत. त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानितही केले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी राहुल आवारे, उत्कर्ष काळे, विक्रम कुराडे यांसारखे कुस्तीपटू तयार केले. शैलेश शेळके, हर्षवर्धन सदगीर यांच्यावर मेहनत घेतली.
ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व काका पवारला करता आले नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावं लागेल. पवारानंतर बीड जिल्ह्यातील पाटोदाच्या राहुल आवारेने राष्ट्रकुल आणि जागतिक कुस्ती स्पर्धा गाजवली. पाटोद्यातून पुण्याला जात आवारेने कष्टाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जागतिक स्पर्धेत कास्य, आशियायी स्पर्धेत कास्य आणि रौप्यपदक पटकावले. कष्टाचे
फळ म्हणून अर्जुन पुरस्कार मिळाला. आता ते पोलिस दलात रुजू झाले आहेत. आता आवारे यांना २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकचे वेध लागले आहे.
मराठवाड्याने खो-खोपटू सारिका काळेच्या रूपाने तिसरा अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू दिला आहे. धाराशिव तालुक्यातील रुईभर या गावची सारिका काळे आहे.
२००६ मध्ये पहिल्यांदा सारिकाची महाराष्ट्र संघात निवड झाली. त्यानंतर २० राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. सांघिक खेळात सारिकाने १२ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कास्यपदके मिळवून दिली आहेत. २०१०-११ च्या हंगामात ती महाराष्ट्राची कर्णधार होती. तिच्या नेतृत्वात छत्तीसगडमध्ये महाराष्ट्राने सुवर्णपदक जिंकले. २०१५-१६ मध्ये तिची भारतीय संघात निवड झाली.
तिथे भारताने सुवर्णपदकही जिंकले. त्यानंतर ती भारतीय खो-खो संघाची कर्णधार झाली आणि देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. याचे श्रेय प्रा. चंद्रजित जाधव यांना द्यावे लागेल. त्यांनीच या गुणी खेळाडूला हेरले होते. आज सारिका राज्य शासनाच्या क्रीडा विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे या मांडवा एक्स्प्रेसने अॅथलेटिक्समध्ये भारताचे नाव कमावले आहे. भारतातर्फे अविनाश साबळेने गेल्यावर्षी बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत नवा इतिहास घडवला. ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह अविनाश साबळेने रौप्य पदकाची कमाई केली. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अविनाश भारतीय सेनेत दाखल झाला. आई- वडील वीट्टभट्टीवर काम करायचे. शाळेत जाताना व येताना अविनाश साबळे धावण्याचा सराव करायचा. अविनाशने ऑलिंपिकपर्यंत धडक मारली आहे.
मराठवाड्यातील इकबाल सिद्दिकी आणि संजय बांगर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे. औरंगाबाद एक्स्प्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या इकबाल सिद्दिकीने भारतातर्फे एक कसोटी सामनाही खेळला. १९९२-९३ रणजी हंगामात महाराष्ट्रातर्फे पदार्पण करणाऱ्या इकबाल सिद्दिकीला भारतीय संघात तब्बल ९ वर्षांनंतर स्थान मिळाले. कसोटीमध्ये मनोज प्रभाकरनंतर पदार्पणातच गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सलामी करणारा इकबाल सिद्दिकी हा दुसरा खेळाडू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये
जन्मलेल्या इकबाल सिद्दिकीने प्रथम दर्जा आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ३९५ बळी मिळवले आहे. शिवाय फलंदाजीत १७०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. संजय बांगरनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावले.
संजय बांगरने १२ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले. एका शतकासह संजय बांगरने ४७० धावा केल्या आहेत. तर, वन डेमध्ये एका अर्धशतकासह १५ सामन्यांत १८० धावा फटकावल्या आहेत. याशिवाय संजय बांगरने १६५ प्रथम दर्जाच्या सामन्यात ८,३४९ धावा १३ अर्धशतकांसह फटकावल्या आहेत. आज समालोचक आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा मुख्य प्रशिक्षक या नात्याने संजय बांगर वावरत आहे.
सिद्दिकी, बांगर यांच्यासह अनंत नेरळकर, श्रीकांत मुंडे यांनीही प्रथम दर्जाचे सामने गाजवले आहेत. नांदेडचा अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंडे हा सध्या नागालॅंडकडून खेळतो. सध्या तुळजापूर एक्स्प्रेस नावाने राजवर्धन हंगरगेकर ओळखला जातो. राजवर्धन हंगरगेकरने आपले अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताच्या १९ वर्षांखालील संघात प्रवेश केला. भारताने विश्वविजेतेपद पटकावले, त्यात राजवर्धन हंगरगेकरच्या अष्टपैलू खेळाचा वाटा होता. आज चेन्नई सुपर किंग्सतर्फे आयपीएलमध्ये राजवर्धन हंगरगेकर खेळत आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगरचा अंकित बावणे हा देशांतर्गत क्रिकेट गाजवत आहे. ११० प्रथम दर्जाच्या सामन्यांत अंकितने ७३४१ धावा, २१ शतके आणि ३८ अर्धशतके झळकावली आहेत. मधल्या फळीत खेळणारा अंकित फार्मात असतानाही भारतीय संघात घेण्यात आले नाही. जालन्याच्या विजय झोलनेही आपली छाप टाकली आहे. लातूरचा प्रसाद कानडे हा मध्यमगती गोलंदाज, त्याने प्रथम दर्जाच्या १९ सामन्यांत ५३ बळी घेतले. छत्रपती संभाजीनगरच्या संदीप दहाडने मुंबईतर्फे प्रथम व लिस्ट ए सामन्यात ५१ बळी घेतले. तो आज प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
जिम्नॅस्टिकमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सुधीरदादा जोशी यांनी अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू दिले आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी जिम्नॅस्टिक खेळाडू तयार करण्याचा कारखानाच निर्माण केला आहे. मकरंद जोशी, आदित्य जोशी, संकर्षण जोशी, अंजली शिरसीकर यांच्यासह तब्बल २५ शिवछत्रपती पुरस्कार विजेते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाने दिले आहेत. एमएसएन या नावाने जिम्नॅस्टिक आणि रिदमीक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्रामध्ये आजही दबदबा कायम आहे. त्यांचा वारसा आता डॉ. मकरंद जोशी आणि अॅड, संकर्षण जोशी हे पुढे चालवत आहेत.
मराठवाड्यात तालुका क्रीडा संकुलाबरोबर जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती झाली; पण म्हणावा तसा क्रीडा विकास मराठवाड्यात होऊ शकला नाही. विभागीय क्रीडा संकुलाबरोबरच जिल्हा क्रीडा संकुलाचीही अवस्था फार चांगली नाही. भाजप- शिवसेना युतीच्या काळात क्रीडा प्रबोधिनीची सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा प्रबोधिनीने महाराष्ट्राला खेळाडू दिले. मात्र, भारतीय संघाला खेळाडू देण्यामध्ये ही प्रबोधिनी अपयशी ठरली आहे.
१९८० च्या दशकात मोठ्या संघर्षाने मराठवाड्यात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे केंद्र आले. प्रारंभी या साई क्रीडा केंद्रात प्रगती झाली नाही; पण औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका सुनावणीस आल्यानंतर हे केंद्र हलविले जाणार नाही आणि या केंद्राचा विकास केला जाईल, अशी हमी केंद्र सरकारने दिली. वीरेंद्र भांडारकर केंद्राचे प्रमुख असताना सोयीसुविधा निर्माण झाल्या. त्याचा लाभ मराठवाड्यातील खेळाडू घेत आहेत.
(लेखक क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)