MIM-महाविकास आघाडीची सध्या तरी नुसतीच ‘होऊ द्या चर्चा’

एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिली
Imtiyaz Jaleel rajesh Tope
Imtiyaz Jaleel rajesh Topesakal

औरंगाबाद : एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या बातमीने धूळवडीच्या दिवशी उडालेला धुराळा सध्या तरी नुसतीच होऊ द्या चर्चा, अशाच प्रकारची ठरण्याची शक्यता आहे. कारण यावर खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आम्ही मित्र असून दोन मित्रांमध्ये जशी चर्चा होते तशा गप्पा झाल्याचे स्पष्ट केले आहे. या अनौपचारिक चर्चेतून आलेल्या या प्रस्तावावर किती गांभीर्याने महाविकास आघाडीचे नेते विचार करतात यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाल्याने त्यांची आरोग्यमंत्री टोपे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या सांत्वनपर भेटीतील चर्चेनंतर एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू झाली.

या भेटीविषयी आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले, की काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. त्यांची सांत्वनपर भेट घेतली. भेटीदरम्यान, काही मुद्यांवर अनौपचारिक चर्चा झाली. यामध्ये उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत एमआयएममुळे १०-१५ जागा पडल्या, भाजपविरोधी आघाडीच्या तेवढ्या जागा वाढल्या असत्या, याकडे श्री. टोपे यांनी इम्तियाज यांचे लक्ष वेधले.

त्यावर इम्तियाज जलील यांनी भूमिका मांडताना सांगितले की, अल्पसंख्याक समुदायाचा विकास करणे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी आमचे काम सुरू असते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारकडून अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी कायमच प्रयत्न सुरू असल्याचे श्री. टोपे यांनी इम्तियाज यांना सांगितले. एमआयएमच्या प्रस्तावावर पक्षातील वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असेही श्री. टोपे यांनी स्पष्ट केले.

राजकीय वर्तुळाचे लक्ष

या भेटीतून महाविकास आघाडीसोबत जाण्याची एमआयएमची तयारी असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत निरोप पोचविण्याची विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केल्याचे समजते. एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचे असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आणखी एक वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी एका वाहिनीशी बोलताना केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

सांत्वनासाठी गेले तर राजकीय चर्चा कशाला?

इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या प्रस्तावावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. एमआयएमच्या प्रस्तावावर भाष्य करण्याचा अधिकार टोपे यांना कुणी दिला? शरद पवारांपेक्षा ते मोठे आहेत का? सांत्वनासाठी गेले होते तर तिथे राजकीय चर्चा कशाला केली? असे मुद्दे उपस्थित करत खैरे यांनी संताप व्यक्त केला. इम्तियाज खासदार झाल्यापासून शहरातील वातावरण कसे गढूळ झाले, दंगेधोपे वाढले असे सांगतानाच त्यांनी राजाबाजारमध्ये झालेल्या दंगलीचा दाखलाही दिला. अनेक मुस्लिम लोक आपल्याकडे त्यांच्या कारभाराविरुद्ध तक्रारी घेऊन येतात, असा दावाही खैरेंनी केला.

''काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत कोणाला घ्यायचं किंवा कोणासोबत जायचं हा त्यांचा निर्णय आहे. यात ते इम्तियाज जलील त्यांच्यासोबत जायला तयार असतील तर त्यावर टिप्पणी करण्याचे कारण नाही. कोणी कोणासोबत गेले तरी, भाजप स्वबळावर लढणार आहे. तेही संपूर्ण ताकतीनिशी लढणार आहे. एमआयएम कोणत्या बाजूने लढते माहित नाही, मात्र आमचं नाणं खणखणीत आहे. ते कोणत्या नाण्यांची बाजू आहे, ते त्यांना सिध्द करावे लागणार आहे.

-पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com