
वैजापूर : हातउसने पैसे घेऊन बिले भरली, आता वीज द्या !
वैजापूर : महावितरणने शेतपंपाची वीज खंडित करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी शेतकऱ्यांनी हातउसणे पैसे घेऊन वीजबिलाचे हप्ते भरले. परंतु, वीजबिले भरूनही शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मनसेच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता.२७) तालुक्यातील लाडगाव सबस्टेशनवर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन केले.
विजेची अनियमितता, कमी दाबाने वीजपुरवठा, यामुळे होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे तालुक्यातील शेतकरी, तसेच ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दिवसा वीज, तर कधीच पूर्णदाबाने मिळत नाही. परंतु, रात्री देखील विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रविवार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी लाडगाव येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला.
यावेळी वीरगाव पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महावितरणचे अधिकारी यांनी दोन दिवसांत गावांना पूर्ण दाबाने अखंडित विद्युत पुरवठा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळेस जयश्री बागुल, सुनील गायकवाड, नंदू हिरडे, योगेश तुपे, उषा कुमावत, मंगल गायकवाड, विष्णू चन्ने, किशोर सुरासे, सत्यजित सोमवंशी, संतोष घंगाळे, गोविंद खटाणे, गोकूळ जाधव, प्रदिप जाधव, रुतुराज सोमवंशी, भगवान चौधरी, दत्तात्रेय खटाने, रवी डोंगरे यांची उपस्थिती होती.
यावेळी वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय नरवडे, नवनाथ कदम, महावितरणचे सहाय्यक अभियंता विराग सोनवणे, अनिल डुकरे व परिसरातील आजी माजी सरपंच, पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Web Title: Msedcl Office Take Money And Pay The Bill Now Pay Electricity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..