
सिल्लोडमध्ये महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने मुंडन आंदोलन
सिल्लोड (जि. औरंगाबाद) - महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवार (ता. 11) रोजी तहसिल कार्यालयासमोर मुंडन आंदोलन सुरू करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासुन शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत. शासन स्तरावरून संपाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने सिल्लोड व सोयगाव उपविभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सामुहिक मुंडन आंदोलनाचे हत्यार उपसले. तहसिल कार्यालयाच्या परिसरात ढोलताशांच्या गजरात कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन सुरू केले आहे.
संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. यामध्ये महसूल कर्मचारी संघटनेने अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन वर्षांपासून प्रलंबित असून, याबाबत शासनाने आजपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील महसूल विभागातील विविध ठिकाणी महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. महसूल सहायक पदांच्या भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखिल भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. या प्रमुख मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेकडून वारंवार आंदोलन करण्यात आले होते. शासनाने देखिल याबाबत आश्वासनाची पुर्तता करण्यात येईल असे आश्वासन वेळोवेळी दिले. परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. यासाठी आठ दिवसांपासून महसूल संघटनेच्यावतीने कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. त्याच अनूशंगाने शासनाचे आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी मुंडन आंदोलन करण्यात आले.
महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष परेश खोसरे यांच्या मार्गदर्शनामध्ये संघटनेचे उपविभागीय अध्यक्ष संतोष परदेशी, सिल्लोड तालूका अध्यक्ष संतोष राठोड, सोयगाव तालूका अध्यक्ष शरद पाटिल, नायब तहसिलदार प्रभाकर गवळी, शिवाजी सोनवणे, अशोक मोरे, उपाध्यक्ष अनिल देशमुख, उपसचिव आकाश तुपारे, स्वाती म्हाळसणे, चतुश्रेणी कर्मचारी देविदास भोरकडे, कोतवाल संघटनेचे तालूका अध्यक्ष गजानन हासे, प्रमुख मार्गदर्शक दिलिप शिंदे, गोपीनाथ जैवळ, किशोर दांडगे, विजय उमाळकर, रविंद्र राजपुत, भगवान शिसोदे, नामदेव सोनवणे, आसेफ पठाण यांची उपस्थिती होती.
Web Title: Mundan Agitation Behalf Revenue Employees Union Sillod
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..