शिवजयंतीची मिरवणूक पाहायला गेला, तरुणाचा भोसकून खून

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीची धामधूम असताना शहरातील पुंडलिकनगरात बुधवारी (ता.१९) रात्री पावणेआठच्या सुमारास तरुणाला दोघांनी चाकूने भोसकले. गंभीर जखमी तरुणाला एमआयटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

श्रीकांत गोपीचंद शिंदे (वय २१, रा. गल्ली क्र. १०, पुंडलिकनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा दोन संशयितांवर गुन्हा दाखल झाला. वेदशास्त्रातील शिक्षण घेतलेला श्रीकांत हा मिरवणूक पाहायला गेला होता.

मिरवणुकीमध्ये नाचण्यावरून दोन तरुणांनी त्याच्या छातीवर चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला, असे पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात श्रीकांतचा भाऊ सूरजने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

घटनेदरम्यान, नितीन नावाच्या व्यक्तीने सूरजच्या आईला माहिती दिली. यावेळी श्रीकांतला एमआयटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी रात्री नऊच्या सुमारास श्रीकांतला मृत घोषित केले.

राहुल भोसले आणि छोटू वैद्य अशी दोघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, विजय उर्फ छोटू यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी रात्री उशिरा दिली. मिरवणुकीत नाचण्यावरून ही घटना झाली असावी, असेही त्यांनी सांगितले. 

वेदशास्त्राचे घेतले होते शिक्षण 

श्रीकांत हा शहरातील एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होता. त्याचे वेदशास्त्रातील शिक्षणही झाले असून, तो नियमित पूजापाठ करीत असे. आध्यात्मिक वारसा असलेल्या त्याच्या घरात श्रीकांतसह त्याचे दोन भाऊही उच्चशिक्षित आहेत. श्रीकांतचे वडील गोपीचंद शिंदे हे एका कंपनीत कार्यरत आहेत. 

पोलिसांची सावधगिरी... 

मिरवणुकीचे शहरात उत्साहाचे वातावरण असल्याने पोलिसांनी सावधगिरी बाळगत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण लवकर माध्यमांसमोर येऊ दिले नाही. दुसरीकडे पोलिस विभागासह गुन्हे शाखेचे अधिकारी संशयितांच्या शोधासाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संशयितांचे आई-वडील ताब्यात 

श्रीकांतला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन्ही संशयितांच्या आई-वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, दोघांचेही मोबाईल बंद होते.

न्यायवैद्यकचे अधिकारी हजर 

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी पाहणी केली. न्यायवैद्यक विभागाचे अधिकारीही दाखल झाले. त्यांनी तपासासाठी रक्ताचे नमुने घेतले. पोलिस उपायुक्त राहुल खाडे, श्री. सोनवणे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा दाखल झाला होता. संशयितांच्या शोधासाठी पोलिस रात्रभर पुंडलिकनगर भागात शोध घेत होते. रात्री उशिरापर्यंत संशयित सापडले नव्हते.

Murder In Shivjayanti Miravnuk Aurangabad News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com