औरंगाबाद : कार, ट्रक अपघातात एक ठार; एक जखमी

बसचालकांमुळे ५१ प्रवाशांचा जीव वाचला; कुंभेफळ फाट्याजवळील घटना
Car accident
Car accidentsakal

करमाड - कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजक फोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या भरधाव ट्रकला धडकून झालेल्या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार तर चालक किरकोळ जखमी झाला. दरम्यान, ट्रकच्या पाठीमागे असलेल्या बसच्या चालकाने अचानक समोर घडलेल्या प्रसंगातही प्रसंगावधान राखीत बस रस्त्याच्या खाली नेल्याने ५१ प्रवासी बालंबाल बचावल्याची घटना सोमवारी (ता.२५) रात्री ११ च्या सुमारास घडली. या अपघातात जालना येथील एसआरजे स्टील या लोखंडी सळ्या बनवणाऱ्या कंपनीचे वसुली अधिकारी अमेर उस्मानी (४२, रा.जालना) यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक दत्ता मोरे (३८, अंबड जि.जालना) जखमी झाला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, इनोव्हा कार (क्र.एम.एच-२१ एएच-६३९८) औरंगाबाद येथून जालन्याकडे जात होती. शेंद्रा एमआयडीसीच्या कुंभेफळ फाट्यावरून पुढे जाताच लाडगाव उड्डाणपुलाच्या अलीकडे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट रस्तादुभाजक फोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या ट्रकला (क्र.टी.एस-१३ व्हीसी-७२४१) धडकली. ही धडक एवढी जोराची होती की ट्रकनेही कार सुमारे शंभर फुट अक्षरशः क्लीनर बाजूने घसरत गेली. यात चालक बाजुपर्यंत कार पूर्णतः कापली गेल्याने मयत अमेर यांना गाडीतून काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

दरम्यान, याचवेळी ट्रकमागे हिंगोली डेपोची हिंगोली ते पुणे जाणारी बस (क्र.एमएच- ०६एस-८६४५) होती. ही बस समोरील सळ्या भरलेल्या ट्रकला धडकणार तोच क्षणाचाही विलंब न करता बसचालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या खाली नेली. यावेळी बस लोखंडी सळ्यावर चढून दुकानाच्या दगडी बांधकाम असलेली कंपाऊंडची सुमारे दहा फूट भिंत फोडत दुकानातील लोखंडी रॅक व लिंबाच्या झाडाला धडकून बंद पडली. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या ५१ प्रवाशांचे जीव वाचू शकले. बसचे किरकोळ नुकसान झाले. या घटनास्थळावरून अवघ्या दहा फूट अंतरावर रस्त्यालगत भला मोठा खड्डा होता. बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

दुकान मालकाचे मोठे नुकसान

या घटनेत श्री साई इंटरप्रायजेस दुकानाचे संचालक रावसाहेब शेळके यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात बसवर चढल्याने दोन टन लोखंडी सळ्या पूर्णपणे बेंड झाल्या, कंपाऊंडची दगडात पक्की बांधकाम केलेली भिंत कोसळली व सुमारे पंचवीस फूट लांबीचे व दहा फुट उंचीचे लोखंडी रॅकही मोडकळीस गेला. दोन लाख रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाने भरून देण्याची मागणी त्यांनी बस चालका मार्फत व करमाड पोलिसांकडे केली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास थेट परिवहन मंत्र्याकडे धाव घेण्याचा इशाराही रावसाहेब शेळके दिला आहे. विशेष म्हणजे दुपार पर्यंत ही बस बाजूला न केल्या गेल्याने श्री. शेळके यांना मंगळवारी दुपारपर्यंत दुकान बंद ठेवावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com